ढाका,
pakistan बांगलादेशच्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी रशियातून पाठवण्यात येणाऱ्या अणुइंधनाच्या वाहतुकीला विलंब झाला आहे. युरेनियम घेऊन जाणाऱ्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी न मिळाल्याने २४ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली खेप बांगलादेशात पोहोचू शकली नाही. या प्रकरणावर पाकिस्तानच्या ढाका येथील उच्चायुक्तालयाने स्पष्टीकरण देताना हा विषय तांत्रिक आणि प्रक्रियात्मक स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने सांगितले की, देशाकडून आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियम आणि प्रक्रियांचे पालन केले जाते. राजनैतिक उड्डाणे तसेच हवाई हद्द वापरण्याच्या परवानग्यांशी संबंधित विनंत्यांवर निर्धारित नियमांनुसार कार्यवाही केली जाते. रूपपूर प्रकल्पाच्या अणुइंधनाच्या विमानाशी संबंधित प्रकरण हे उड्डाण मार्ग आणि हवाई हद्दीच्या परवानगीशी निगडित तांत्रिक व्यवस्थेचा भाग असल्याचे उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये विमान वाहतूक तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाची आवश्यकता असल्याने उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असेही पाकिस्तानने स्पष्ट केले.
या प्रकरणाचा बांगलादेश-पाकिस्तान संबंधांवर परिणाम होईल अशा पद्धतीने अर्थ लावू नये, असेही पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंधांना पाकिस्तान महत्त्व देत असल्याचे सांगत या घटनेकडे योग्य तांत्रिक संदर्भात पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनम यांनी सांगितले की, २४ सप्टेंबरला युरेनियम घेऊन येणारे मालवाहू विमान बांगलादेशात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी न मिळाल्याने विमानाचे नियोजित उड्डाण होऊ शकले नाही. आता रशियाकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अणुइंधन बांगलादेशात पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव शेख मोहम्मद तौहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, अणुइंधनाच्या आगमनासाठी विमानतळावर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली होती. अधिकारी विमानाची प्रतीक्षा करत असतानाच रोसाटॉमच्या संपर्क अधिकाऱ्याकडून हवाई क्षेत्राची परवानगी न मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नियोजित उड्डाण पुढे ढकलावे लागले. आता नव्या वेळापत्रकानुसार ही खेप बांगलादेशात आणण्याची तयारी केली जात आहे.
रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प हा बांगलादेशचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प असून रशियाच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमच्या तांत्रिक सहकार्याने त्याची उभारणी होत आहे. पद्मा नदीच्या काठावरील पाबना जिल्ह्यातील ईश्वरदी उपविभागातील रूपपूर येथे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात तिसऱ्या पिढीतील दोन व्हीव्हीईआर-१२०० अणुभट्ट्या उभारल्या जात असून त्यांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता २,४०० मेगावॅट आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या युनिटसाठी आवश्यक असलेल्या कमी-समृद्ध युरेनियम इंधनाची पहिली खेप २०२३ मध्ये रशियातून बांगलादेशात पोहोचली होती. या खेपेत १६४ नवीन इंधन संच होते. रशियातून हे अणुइंधन ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर किरणोत्सर्गापासून सुरक्षित कंटेनरमध्ये हे इंधन कडक सुरक्षेत रूपपूर प्रकल्पापर्यंत नेण्यात आले. यासाठी विशेष ‘हरित मार्ग’ तयार करण्यात आला होता आणि सुरक्षेची जबाबदारी बांगलादेश लष्कर तसेच कायदा-सुव्यवस्था यंत्रणांनी सांभाळली होती.
आता दुसऱ्या युनिटसाठीच्या अणुइंधनाची खेप नियोजित वेळेत पोहोचली नसल्याने त्याच्या नव्या वाहतूक वेळापत्राकडे लक्ष लागले आहे. पाकिस्तानने परवानगी नाकारण्यामागे तांत्रिक आणि प्रक्रियात्मक कारणे असल्याचे स्पष्ट केले असून रशियाकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याची नवीन तारीख प्रस्तावित करण्यात आली आहे.