बुलढाणा,
chancellor-milind-barhate आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्त्व विकास अत्यंत महत्वाचा आहे. नोकरी असो वा व्यवसाय, त्यासाठी युवा महोत्सवासारख्या उपक्रमांमधील सहभाग विद्याथ्र्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करतो, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले.
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव युवा संस्पर्श - २०२६ चे राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलढाणा येथे दि. २९ सप्टेंबर रोजी उदघाटन संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्दारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशनच्या सचिव पद्माताई सावळे, संस्थेच्या सहसचिव अॅड. कीर्ती प-हाड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. विजय नागरे, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कावरे, डॉ. विजय बोरकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करत, विद्यापीठाला मिळालेल्या यूएस वल्र्ड रँकिंग मधील नामांकनाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करत कुलगुरू पुढे म्हणाले चार दिवस चालणा-या या युवा महोत्सवात विद्याथ्र्यांना आपल्यातील कलागुणांचे सादरीकरणासह नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्याचे व्यासपीठही उपलब्ध झाले आहे. व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करणे हीच यशाची पहिली पायरी आहे. या महोत्सवातील विविध स्पर्धांचे मूल्यमापन अत्यंत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पध्दतीने केले जाणार आहे. यातून निवडले जाणारे गुणवंत संघ पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतील. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक व इतर पारितोषिके मिळवून विद्याथ्र्यांनी मिळवलेले यश हे याच पारदर्शक निवडीचे फलित आहे. सर्व विद्याथ्र्यांनी आपल्या कला पूर्ण क्षमतेने सादर करून या महोत्सवाचा आनंद घ्यावा या आवाहनासह सहभागी विद्याथ्र्यांना कुलगुरूंनी शुभेच्छा दिल्यात.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध सांस्कृतिक व कलात्मक स्पर्धांचा थरार या ठिकाणी रंगणार आहे. संलग्नित महाविद्यालयांमधून सहा हजाराहून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होत आहेत. विद्याथ्र्यांनी पुस्तकीय ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान व निरिक्षण कौशल्यावर भर दिला पाहिजे. प्रत्येकाने सजग राहून नशामुक्त जीवन जगण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सर्व सहभागी विद्याथ्र्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी अॅड. कीर्ती प-हाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बेस्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार मुलांमधून हर्षल किरण पाटील, जी.एस. महाविद्यालय, खामगाव तर मुलींमधून विद्याभारती महाविद्यालय अमरावतीची श्रावणी प्रमोद आपोतीकर हिला, उत्कृष्ट कलावंत पुरस्कार डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावतीच्या निखिल बाळू सखे याला, तर सिपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची निहाल लक्ष्मीकांत आसोपा हिला प्रत्येकी दहा हजार रुपये रोख पुरस्कार देऊन, तर आदर्श विद्यार्थी पुरस्कार रुपये १५ हजार रोख स्वरूपाचा ब्राजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावतीचा वेध विवेक बारलिंगे, तर शंकरलाल खंडेलवाल कला व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची प्रणाली विनोद पिंपळकर हिला मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. निखिलेश नलोडे यांच्यासह डॉ. सावन देशमुख, डॉ. नेत्रा मानकर, डॉ. प्रशांत बागडे, प्रा. सूरज हेरे, डॉ. सीमा देशमुख, डॉ. शर्मिला देशमुख यांनी परिश्रम घेतले. तसेच अरुणभाऊ चव्हाण, डॉ. शिरीष जैन, डॉ. हर्षद केला, डॉ. विजय बोरकर, प्रा. मोहसीन खान, प्रा. पवन जगताप, प्रा. सुजित पाटील, प्रा. नरवाडे, डॉ. राणे आणि डॉ. ठाकुर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.