वर्धेत पहिल्यांदाच कुष्ठरुग्णांवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया

उमेश ताकसांडे

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
वर्धा,
leprosy-patients कुष्ठरोगमुत वर्धा जिल्हा हा उद्देश समोर ठेवून कुष्ठरोग विभाग नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवित आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. रा. ज. पराडकर यांच्या संकल्पनेतून मंगळवार २९ रोजी चार कुष्ठरोग रुग्णांवर यशस्वी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यशस्वी शस्त्रक्रीयेने आरोग्य यंत्रणेतील डॉटरांचे मनोधैर्यही वाढले आहे.
 
 
leprosy-patients
 
जिल्ह्यात ज्या कुष्ठरुग्णांना पुर्नरचनात्मक शस्त्रक्रियेची गरज आहे अशांना आतापर्यंत अमरावती येथे पाठविले जात होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही व्हायची. मात्र, जिल्ह्यातील गरजू कुष्ठरुग्णांना जिल्ह्यातच पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा या हेतूने एक नवीन प्रयोग करण्याचा मानस कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. रा. ज. पराडकर यांनी व्यत करीत त्यावर कृती केली. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ३१ कुष्ठरुग्णांना पाचारण करण्यात आले होते. तपासणीअंती १० कुष्ठरुग्ण पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तर सहा रुग्णांचे काही तपासण्या अहवाल प्रलंबित होते. त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मंगळवारी ४ गंभीर कुष्ठरुग्णांवर यशस्वी पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. यात ३ पुरुष व एका महिला कुष्ठरुग्णाचा समावेश आहे.
 
 
शस्त्रक्रियेकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील डॉ. सुशील मानकर तसेच डॉ. अनिल गोल्हर व त्यांच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. चारही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात जिल्हा रुग्णालयातील डॉ. नितीन बढे, डॉ. सोनू मडावी, डॉ. रॉय यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
आता अमरावती येथे जाण्याची गरज नाही : डॉ. पराडकर
पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेची गरज असलेल्या जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांना अमरावती येथे पाठविले जात होते. मात्र, मंगळवारी जिल्हा रुग्णालयात प्रथमच विशेष शिबिर घेण्यात आले. या दरम्यान ४ कुष्ठरुग्णांवर यशस्वीरित्या पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. रा. ज. पराडकर यांनी दिली.