कापूस विक्रीच्या नावाखाली ७.२५ लाखांनी गंडा

हिंगणघाट पोलिसांत प्रवीण खाटीकविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
वर्धा,
cotton-sales दीडशे क्विंटल कापूस विक्री करण्याचे आमिष दाखवून आडत्याची ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तक्रारीनंतर समोर आला. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव (बु.) येथील प्रवीण खाटीक (४५) याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंगणघाट तालुयातील नांदगाव येथील प्रभाकर कलोडे (४८) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कलोडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डमध्ये नोंदणीकृत आडते आहे. मागील काही वर्षांपासून त्यांची प्रवीण खाटीक याच्याशी ओळख होती. यापूर्वीही खाटीककडून शेतमालाची खरेदी केल्याने कलोडे यांचा त्याच्यावर विश्वास होता.
 
 
 
२२ एप्रिल २०२५ रोजी प्रवीण खाटीक याने प्रकाश वाईट गोल्ड जिनिंगमध्ये दोन बैलगाड्या कापूस आणला होता. या कापसाच्या खरेदीपोटी त्याला १ लाख ७४ हजार ८३८ रुपये देणे होते. त्यापैकी ४९ हजार ८३८ रुपये रोख देण्यात आले. तर उर्वरित १ लाख २५ हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठविण्याचे ठरले. दरम्यान, खाटीक याने गावातील शेतकर्‍यांचा १५० क्विंटल कापूस विक्रीसाठी असल्याचे कलोडे यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कलोडे यांनी १५० क्विंटल कापूस ११ लाख २५ हजार रुपयांना खरेदी करण्याचे ठरविले.
 
 
त्यानुसार यापूर्वीचे १ लाख २५ हजार रुपये धरून १२ लाख ५० हजार रुपये प्रवीण खाटीक याच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठविण्यात आले. मात्र, दहा दिवस उलटूनही खाटीक कापसाचा माल घेऊन बाजार समितीत आला नाही. त्यामुळे कलोडे यांनी त्यांचा नातेवाईक आशिष कोटकर याला खाटीककडे पाठविले. त्यावेळी खाटीकने लवकरच कापूस देण्याचे आश्वासन दिले. मात्र, एक महिना उलटूनही कापूस किंवा पैसे परत मिळाले नाहीत. वारंवार संपर्क केल्यानंतर खाटीकने दोन टप्प्यांत ५ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित ७ लाख २५ हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करू लागला. पैसे मागितल्यावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अखेर प्रभाकर कलोडे यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रवीण खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.