आगामी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत प्रशासन सरसावले

कुरळा धरणातील पाणीसाठा आरक्षित

    दिनांक :29-Sep-2026
Total Views |
 कृषी पंपाचा वीज पुरवठा केला बंद
 
मालेगाव,
water-shortage यंदा पावसाने तब्बल दोन महिन्याचा खंड दिल्याने आगामी काळात मालेगाव शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नगर पंचायत प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचा उपसा तूर्तास बंद करण्यात आला आहे.
 
 
 
मालेगाव शहराला भविष्यात सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी लघु पाटबंधारे विभाग तसेच नगर पंचायतच्या पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कुरळा प्रकल्पावरील सिंचनासाठी वापरण्यात येणार्‍या कृषी पंपांची वीज जोडणी महावितरणकडून तूर्त तोडण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. पाणीसाठा जपण्यासाठी प्रशासनाचा पुढाकारमालेगाव नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच संबंधित अधिकारी - कर्मचार्‍यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
 
 
शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेबाबत शासन व प्रशासन गंभीर असून, योजनेच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शहरासाठी चाकातिर्थ प्रकल्पावरुन नविन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु, या योजनेचे अद्यापही संथगतीने सुरु आहे. ही योजना जलदगतीने पुर्णत्वास गेल्यास नागरीकांना मुबलक व नियमीत पाणी पुरवठा होईल. यासाठी शासन व प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
 
 
कुरळा धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यावर भर. सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचा उपसा तूर्त बंद. कृषी पंपांची वीज जोडणी महावितरणकडून तोडण्यात आली. शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि जलसाठ्यावर नियमित देखरेख. आगामी पाणीटंचाई टाळण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय. नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठ्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाने माहिती देतांना सांगीतले.
 
 
पावसाचा खंड आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. कुरळा प्रकल्पातून मालेगाव शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पाणीपुरवठा विभाग सतर्क असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती नगर पंचायतचे पाणीपुरवठा अभियंता योगेश तायडे यांनी दिली. दरम्यान, जलसंधारण विभागाचे अतुल म्हात्रे हे देखील आगामी पाणीटंचाईच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.