१५ सप्टेंबरला कार्यक्रम न झाल्याने नाराजी
नागपूर,
zilla-parishad भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबरला साजरा होणारा अभियंता दिन यंदा नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून साजराच करण्यात आला नव्हता. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली होती. कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर हालचाली सुरू झाल्या असून, अखेर १ ऑक्टोबरला नियोजन भवन येथील सभागृहात अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंत्यांच्या गौरवाचा कार्यक्रम आयोजित करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. यंदा मात्र १५ सप्टेंबरला कोणताही सामूहिक कार्यक्रम न झाल्याने नाराजीची भावना निर्माण झाली होती. यंदाचा कार्यक्रम नेहमीपेक्षा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार असून यामध्ये प्रश्नमंजूषा, गायन, अभिनय व स्टँड-अप कॉमेडी अशा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व समग्र शिक्षा अभियानातील अभियंते परिश्रम घेत आहेत.
निमंत्रण पत्रिकेतील गौप्यस्फोट
या कार्यक्रमाची सर्वात विशेष बाब म्हणजे निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी तसेच इतर कोणत्याही मान्यवरांच्या नावांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेत मान्यवरांची नावे नसल्याचे प्रथमच पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जास्तीत जास्त अभियंत्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सोहन चवरे यांनी केले आहे.