वर्धा,
tigress समुद्रपूर तालुक्यातील कोरा आणि पवनगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वाघिणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तिला नागपूरला रवाना करण्यात आले आहे.
समुद्रपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाघांच्या संचारामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात वाघांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याचदरम्यान एका वाघिणीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.
या पार्श्वभूमीवर संबंधित वाघिणीला तातडीने जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी आमदार कुणावार यांनी वनमंत्री नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर वन विभागाने वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात केले होते.
गेल्या काही दिवसांपासून वन विभागाचे पथक वाघिणीच्या मागावर होते. तिच्या हालचालींचा मागोवा घेत योग्य संधीची प्रतीक्षा केली जात होती.tigress अखेर आज वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले आणि धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
वाघीण जेरबंद झाल्याने कोरा, पवनगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वाघिणीला ताब्यात घेतल्यानंतर तिला पुढील तपासणी व आवश्यक कार्यवाहीसाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे.