अनिल कांबळे
नागपूर,
inspectors transferred दोन हवालदारांनी लाचखोरी केल्यानंतर जरीपटक्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार क्राइम ब्रँच युनिट-४चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांची एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सक्करदरा वाहतूक विभागाचे निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांच्याकडे जरीपटका पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जरीपटका पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार अनिल ताकसांडे यांना काही दिवसांपूर्वी पोलिस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले होते. त्यानंतर चौधरी यांच्याकडे प्रभारी ठाणेदार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता विठ्ठलसिंह राजपूत यांच्या नियुक्तीमुळे जरीपटका पोलिस ठाण्याला नियमित ठाणेदार मिळाला आहे. बाबूराव राऊत आणि विठ्ठलसिंह राजपूत या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना संबंधित पोलिस ठाण्यांचा कार्यक्षेत्राचा अनुभव आहे. बदलीचे आदेश जारी झाल्यानंतर दोन्ही अधिकारी लवकरच नव्या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत. एमआयडीसी आणि जरीपटका या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान नव्या ठाणेदारांसमोर राहणार आहे.