मुंबई
vishakha subhedar ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक कलाकारांना घराघरांत ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ओंकार भोजने, गौरव मोरे यांच्यासह अनेक कलाकारांनी कालांतराने शोमधून एक्झिट घेत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आणि नव्या फॉरमॅटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच यादीत अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचाही समावेश आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
‘सिनेविस्टा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विशाखा सुभेदार यांनी सांगितले की, सातत्याने एकाच पद्धतीचे काम केल्यानंतर त्यांना काही काळ ब्रेक घेण्याची गरज वाटत होती. 2011 पासून 2022-23 पर्यंत त्या सातत्याने त्याच फॉरमॅटमध्ये आणि त्याच कलाकारांच्या समूहासोबत काम करत होत्या. त्यामुळे स्वतःसाठी आणि आपल्या कामात काहीतरी वेगळेपणा आणण्यासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
विशाखा सुभेदार यांनी सांगितले की, ‘हास्यजत्रा’ सोडण्याचा निर्णय अजिबात सोपा नव्हता. अनेक प्रेक्षक आजही त्यांना कार्यक्रम का सोडला, असा प्रश्न विचारतात आणि त्यांच्या जुन्या स्किट्सची आठवण काढतात. कलाकाराचे काम ठरलेले असताना अचानक ब्रेक घेणे आर्थिकदृष्ट्याही आव्हानात्मक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले. महिन्याचे EMI आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या असताना कामापासून दूर राहण्याचा निर्णय घेणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, स्वतःच्या कलात्मक vishakha subhedar वाटचालीसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे विशाखा यांनी स्पष्ट केले. विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांनी आपल्याला ओळखले याचा आनंद असल्याचे सांगतानाच, एक कलाकार म्हणून आणखी वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले. ‘कॉमेडी भूमिका करणार नाही’ असा याचा अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या त्या नाटकामध्ये विनोदी शैलीतील भूमिका साकारत आहेत. त्यांनी केवळ स्किटच्या फॉरमॅटपासून काही काळ अंतर घेतले आहे. भविष्यात पुन्हा एक-दोन वर्षांनी त्या अशा फॉरमॅटमध्ये परतण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ‘हास्यजत्रा’ सोडल्यानंतरही त्या अधूनमधून कार्यक्रमाचे एपिसोड पाहतात. एखाद्या स्किटमध्ये आपण असतो तर काय केले असते, असे विचारही मनात येत असल्याचे त्यांनी सांगितले.सिनेमा किंवा इतर प्रकल्पांबाबतही असेच विचार मनात येतात, असे विशाखा यांनी नमूद केले. एखादी भूमिका आपण केली असती तर छान झाले असते, असे कधीकधी वाटते; मात्र अखेरीस प्रत्येकाच्या वाट्याला जे येते, तेच मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचा निर्णय हा कोणत्याही नाराजीमुळे नव्हे, तर सातत्यातून ब्रेक घेऊन स्वतःला वेगळ्या भूमिकांमध्ये आजमावण्याच्या इच्छेतून घेतल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.