17 किलो गांजासह तीन आंतरराज्यीय आरोपींना अटक

17.8 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर,
17 kg ganja ओडिशा राज्यातून विक्रीसाठी गांजा घेऊन चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात येणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून 17.475 किलो गांजा, चारचाकी वाहन आणि 4 भ्रमणध्वनी असा एकूण 17 लाख 8 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौकात करण्यात आली.
 

17 kg ganja seized in chandrapur, three interstate accused arrested 
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना काही व्यक्ती ओडिशातून गांजा घेऊन चारचाकी वाहनाने येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बामणी चौक परिसरात सापळा रचला. संशयित चारचाकी वाहन (एमएच-24 बीआर-9282) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य वनस्पती आढळून आली. पोलिसांनी अमोल रमेश कांबळे (33, रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर), सदानंद रवींद्र जना (32, रा. साबोरीया, ता. खलीगोट, जि. गंजम, ओडिशा), ओंगा बिरा कोवासी (28, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकनगिरी, ओडिशा) यांना अटक केली. त्यांच्याकडून 17.475 किलो गांजा, चार मोबाईल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.