एशियातील सर्वात मोठा एअर शो पुन्हा सज्ज!

‘एरो इंडिया 2027’ची तारीख जाहीर; जगभरातील दिग्गज कंपन्यांचा सहभाग

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
बंगळुरू
aero india 2027 एशियातील सर्वात मोठा एअर शो आणि जगातील प्रमुख एअरोस्पेस व संरक्षण प्रदर्शनांपैकी एक असलेल्या ‘एरो इंडिया’च्या 16व्या आवृत्तीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बंगळुरूच्या येलहंका एअर फोर्स स्टेशनवर 8 फेब्रुवारी 2027 ते 12 फेब्रुवारी 2027 या कालावधीत ‘एरो इंडिया 2027’चे आयोजन करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी तसेच प्रदर्शनासाठी जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया 3 सप्टेंबर 2026 पासून www.aeroindia.gov.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
 

aero india 2027: asia’s biggest air show to be held in bengaluru from february 8 to 12 
संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील प्रमुख एअरोस्पेस आणि संरक्षण कंपन्या, धोरणकर्ते, तंत्रज्ञान तज्ज्ञ, नवोन्मेषक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच संरक्षण दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘एरो इंडिया’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एअरोस्पेस, संरक्षण उत्पादन, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारताच्या वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. याशिवाय व्यावसायिक व्यवहार, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि धोरणात्मक चर्चांसाठीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध होते. भारताची वेगाने विकसित होत असलेली संरक्षण औद्योगिक परिसंस्था आणि जागतिक एअरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील वाढती भूमिका अधोरेखित करण्यासाठीही एरो इंडिया महत्त्वाचे ठरणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भव्य प्रदर्शनासोबत विविध व्यावसायिक आणि धोरणात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. उद्योग ते उद्योग तसेच सरकार आणि उद्योग यांच्यातील संवाद, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि विविध सहकार्याच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होतील. भारतीय वायुदलासह सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइंग टीम्सकडून आकर्षक हवाई प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत. त्यामुळे अत्याधुनिक विमानचालन तंत्रज्ञान आणि हवाई क्षमतांचा थरारक अनुभव प्रेक्षकांना प्रत्यक्ष घेता येणार आहे.
यापूर्वी 2025मध्येही फेब्रुवारी महिन्यात बंगळुरूतील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर एरो इंडिया एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अमेरिकेचे F-35 आणि रशियाचे SU-57 या अत्याधुनिक लढाऊ विमानांनीही भारतातील या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
‘एरो इंडिया 2027’साठी विशेष वेब-आधारित पोर्टलही विकसित करण्यात आले आहे. प्रदर्शनातील सहभागी कंपन्या आणि प्रेक्षकांना सहजपणे नोंदणी करता यावी तसेच विविध सेवा व्यापक स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टिकोनाला आणि जागतिक संरक्षण व एअरोस्पेस पुरवठा साखळीत विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेला ‘एरो इंडिया 2027’मुळे मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून MSME आणि स्टार्ट-अपसह भारतीय संरक्षण उद्योगांचा सहभाग वाढण्याची शक्यता असून, भागीदारी, गुंतवणूक, निर्यात आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.