अकोला,
agricultural-crops-in-jeopardy-submit-immediate-report जिल्ह्यात एका महिन्यांपासून पावसात खंड पडल्याने काही ठिकाणी पीकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी गुरुवार, ३ रोजी अकोला तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते.

हवामान विभागाने यंदा एल निनोचा प्रभाव असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचा प्रभाव सध्या तीव्र झाल्याचे लक्षात येत असल्याने पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेता, प्राथमिक पाहणी अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महसूल व कृषी यंत्रणांना दिले.पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी मीना यांनी अकोला तालुक्यातील बोरगाव खुर्द गावातील नुकसानग्रस्त सोयाबीन पीक क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर डाबकी जहागीर, कुरणखेड व काटेपूर्णा, तसेच बोरगाव मंजू येथील शेती पीकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पिकांची सद्यस्थिती याबाबत माहिती घेतली.यावेळी बोरगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन त्यांनी तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.
ई पीक पाहणीचा घेतला आढावा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा व शासन मुदत मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे.शासन निर्णयाप्रमाणे यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकरी स्तरावरील ई- पिक पाहणी बंधनकारक केली आहे. तरी याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल कृषी सहाय्यक व तलाठ्यांनी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
४.२३ लाख हेक्टरवर पेरणी
कापूस, सोयाबीन, तूर या प्रमुख पिकांसह ४.२३ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. महिन्यापासून पावसाचा खंड असल्याने पिके संकटात सापडली आहेत. दरम्यान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून धडपड सुरू केली असली तरी पिकांची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ८४६ हेक्टरवर कपाशी तर २ लाख ७३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली आहे.