नवी दिल्ली,
Air connectivityदेशातील लहान आणि तुलनेने कमी हवाई संपर्क असलेल्या शहरांना विमानसेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रादेशिक एअरलाइन फ्लाय९१ने मोठा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ४० नवीन एटीआर ७२-६०० टर्बोप्रॉप विमानांची पक्की ऑर्डर दिली आहे. विमानचालन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या श्रेणीतील अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठ्या ऑर्डर्सपैकी एक आहे. कॅटलॉग किंवा सूचीतील किमतींचा विचार केल्यास या व्यवहाराचे मूल्य ८,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणातील विमान खरेदीच्या करारांमध्ये एअरलाइन्सना कंपन्यांकडून मोठी सवलत मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विस्ताराच्या या योजनेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी फ्लाय९१ सध्याच्या तसेच नव्या गुंतवणूकदारांकडून अंदाजे २५० कोटी रुपये उभारण्याच्या प्रक्रियेत आहे. ४० विमानांच्या नव्या ऑर्डरमुळे कंपनीच्या मालकीच्या विमानांची संख्या दुप्पटीहून अधिक होणार आहे. सध्या सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत फ्लाय९१ सिंधुदुर्ग आणि जळगाव यांसारख्या टियर-२ आणि टियर-३ शहरांना जोडण्यासाठी लहान विमानांचे संचालन करते. त्यामुळे नव्या विमानांमुळे देशातील दुर्गम आणि कमी जोडणी असलेल्या भागांमधील हवाई संपर्क अधिक विस्तारण्याची अपेक्षा आहे.
फ्लाय९१चे सीईओ मनोज चाको यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, नव्या विमानांची डिलिव्हरी २०२७च्या अखेरीस सुरू होईल. कंपनीने २०३२पर्यंत ४० विमानांचा ताफा उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एअरलाइनचे अध्यक्ष हर्षा राघवन यांनीही या ऑर्डरला दुजोरा दिला आहे. अंदाजे १ अब्ज डॉलर किमतीच्या या ४० विमानांचा ताफ्यात समावेश झाल्यानंतर देशाच्या प्रादेशिक विमान वाहतूक बाजारपेठेत फ्लाय९१ची भूमिका आणि स्थान आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.