चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या अमेरिकन पत्रकाराला २ वर्षांची शिक्षा

९५ लाख रुपयांच्या बदल्यात देशाशी गद्दारी

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
American journalist spying for China चीनच्या सरकारसाठी परदेशी एजंट म्हणून काम केल्याचे सिद्ध झाल्यानंतर अमेरिकन पत्रकार थॉमस वीर पोकन II याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली. ५१ वर्षीय पोकनने याच वर्षाच्या सुरुवातीला आपला गुन्हा मान्य केला होता. त्याचे वकील चार्ल्स बर्नहॅम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोकन या शिक्षेविरोधात अपील करणार नाही.तुरुंगवासाची शिक्षा संपल्यानंतरही पोकनवरील देखरेख संपणार नाही. त्याला पुढील ३६ महिने पाळत ठेवण्यात येणार असून, या कालावधीत परदेश प्रवास करण्यास त्याला बंदी असेल. फेब्रुवारीमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये तणाव असताना हे प्रकरण समोर आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
 
spy
 
अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, पोकन चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाला मदत करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात होता. त्याच्याकडून लोकांची भरती करण्याचे तसेच संभाव्य सहकाऱ्यांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचे काम करून घेतले जात होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठीचे सहाय्यक ॲटर्नी जनरल जॉन ए. आयझेनबर्ग यांनी पोकनने पैशासाठी आपल्या देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला.पोकन २०१० मध्ये चीनमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने चीनच्या सरकारी दूरदर्शन वाहिनी CCTV सह विविध चिनी माध्यमांसाठी पत्रकार म्हणून काम केले. २०२४ पासून तो चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआमध्ये संपादक म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याच्या पत्रकारितेच्या कामाच्या आडून चीनसाठी वेगळ्याच स्वरूपाचे काम सुरू असल्याचे न्यायालयीन कागदपत्रांतून समोर आले आहे.
 
 
न्यायालयीन नोंदीनुसार, किमान २०१९ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोकन अशा लोकांच्या सूचनेनुसार काम करत होता, ज्यांचा चीन सरकारशी संबंध असल्याची त्याला माहिती होती. त्यात २०१७ मध्ये त्याची भेट झालेल्या एका महिलेचाही समावेश होता. कागदपत्रांमध्ये या महिलेला ‘कॅथी’ असे संबोधण्यात आले आहे. एफबीआयचे विशेष एजंट टिमोथी जे. हिली यांनी २७ फेब्रुवारी रोजी फेडरल कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणातील माहिती दिली आहे.‘कॅथी’ने तयार केलेले अहवाल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वाचल्याचे तिने पोकनला सांगितल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, ‘कॅथी’सोबत केलेल्या कामासाठी पोकनला किमान १,००,००० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच अंदाजे ९५ लाख रुपये मिळाले होते. पोकनचे काम केवळ अहवाल तयार करण्यापुरते मर्यादित नव्हते. संवेदनशील माहिती मिळवून देऊ शकतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची भरती करण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली होती. एका प्रकरणात त्याला ‘व्यक्ती १’ म्हणून नमूद केलेल्या व्यक्तीची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्या व्यक्तीला सॅमसंगचा फोन, संगणक तसेच सिग्नल आणि टेलिग्रामचे पासवर्ड देण्याच्या सूचना त्याला मिळाल्या होत्या. त्याला नेटडिस्कशी संबंधित माहिती देण्यासही सांगण्यात आले होते. जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेत परतत असताना सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण अर्थात CBP अधिकाऱ्यांनी पोकनला अडवले होते. CBP आणि FBI अधिकाऱ्यांच्या चौकशीत त्याने ट्रम्प प्रशासनात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती चीनला गोपनीय माहिती देऊ शकते, असा ‘८० टक्के’ विश्वास असल्याचे सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने असे करू नये, असा सल्ला आपण दिल्याचेही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. ‘कॅथी’ने अनेक वर्षे त्याच्या अमेरिकेतील प्रवासाचा खर्च उचलला होता आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात वारंवार पैसे पाठवले होते, अशी माहितीही पोकनने दिली.