मुंबई
amitabh bachchan बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती 18’ हा क्विझ शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात बिग बी केवळ स्पर्धकांना कोट्याधीश होण्याची आणि मोठी रक्कम जिंकण्याची संधी देत नाहीत, तर त्यांच्यासोबत तसेच प्रेक्षकांशीही दिलखुलास संवाद साधताना दिसतात. गप्पांच्या ओघात अमिताभ अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से आणि अनुभवही शेअर करतात. नुकत्याच झालेल्या भागात त्यांनी अभिनेता सैफ अली खानसोबत असलेल्या कौटुंबिक नात्याचा रंजक खुलासा केला.
‘हैवान’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान हे ‘KBC 18’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी दोघांनाही हॉटसीटवर बसवले आणि गेम खेळण्यासोबतच गप्पांचा फडही रंगला. याच संवादादरम्यान अमिताभ यांनी त्यांचे कुटुंब सैफ अली खानच्या कुटुंबाशी नात्याने जोडलेले असल्याचे प्रेक्षकांना सांगितले. विशेष म्हणजे, या नात्याची वीण थेट ज्येष्ठ अभिनेते दिवंगत राज कपूर यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचते.
अमिताभ यांनी सांगितले की, “बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की हे (सैफ अली खान) आमचे नातेवाईक आहेत. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते राज कपूरजी यांची मुलगी रितू नंदा यांच्या मुलाशी, निखिल नंदा यांच्याशी माझ्या लेकीचं (श्वेताचं) लग्न झालं आहे.” अशा प्रकारे श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांच्या नात्यामुळे बच्चन कुटुंबाचा कपूर कुटुंबाशी संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर अमिताभ यांनी या कौटुंबिक नात्याच्या गुंतागुंतीवरून सैफसोबत मजेशीर संवाद साधला. सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान ही राज कपूर यांची नात असल्याचा उल्लेख करत अमिताभ यांनी विनोदी शैलीत प्रश्न उपस्थित केला की, या नात्यांच्या समीकरणात करीना त्यांना नेमके कोणत्या नात्याने संबोधणार?
“मला जाणून घ्यायचंय की मी करीनाला काय म्हणू? करीना मला काय हाक मारेल?” असा मजेशीर सवाल अमिताभ यांनी केला. अमिताभ यांचा हा प्रश्न ऐकताच सैफला हसू आवरले नाही आणि तो जोरजोरात हसू लागला. त्यानंतर सैफनेही हजरजबाबीपणे, “बरं झालं हा काही या गेममधला प्रश्न नाहीये,” अशी प्रतिक्रिया दिली. सैफचा हा अंदाज पाहून प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.
दरम्यान, कपूर आणि बच्चन कुटुंबातील आणखी एक चर्चेत राहिलेला संबंध म्हणजे करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे नाते. अभिनेत्री करीना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र काही कारणांमुळे त्यांचे ठरलेले लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर करिश्माने संजय कपूर यांच्याशी लग्न केले, तर अभिषेक बच्चनने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत विवाह केला.
अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान यांनी यापूर्वी ‘एकलव्य’ आणि ‘आरक्षण’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबतही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे बच्चन, कपूर आणि पटौदी कुटुंबातील हे जुने संबंध पुन्हा एकदा ‘KBC 18’मधील या गप्पांमुळे चर्चेत आले आहेत.