न्यूयॉर्कमध्ये विद्यार्थ्यांच्या एआय वापरावर बंदी

समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याच्या भीतीने निर्णय

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
न्यू यॉर्क,
ban on students use of ai in new york अमेरिकेतील सर्वात मोठ्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थांपैकी एक असलेल्या न्यू यॉर्क सिटी पब्लिक स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरावर एक वर्षाची स्थगिती लागू करण्यात आली आहे. महापौर झोहरान ममदानी यांनी बुधवारी या निर्णयाची घोषणा केली. वर्गात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत स्पष्ट नियम तयार करण्याच्या दिशेने हे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल आहे. समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यााच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ममदानी यांनी म्हटले आहे.
 
 
ban on students use of ai
 
न्यू यॉर्कमधील सार्वजनिक शाळांमध्ये सध्या वापरली जाणारी सुमारे ४० शैक्षणिक एआय साधने विद्यार्थ्यांसाठी थांबवण्यात येणार आहेत. या निर्णयाचा आठवी इयत्तेपर्यंतच्या सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे. ही बंदी सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे लागू असणार नाही. ममदानी यांनी आदेशाची घोषणा करताना म्हटले की, मुलांच्या शिक्षणात मानवी संवादाचे महत्त्व कायम ठेवण्याला आमचे प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत संबंध निर्माण करणे, इतर विद्यार्थ्यांसोबत कौशल्ये विकसित करणे आणि कठीण प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एआयवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
 
शिक्षकांना नियमातून सवलत
विद्यार्थ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शिक्षकांना एआय वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. धडे तयार करणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे आणि प्रशासकीय स्वरूपाची कामे यांसाठी शिक्षकांना एआय साधनांचा वापर करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या थेट शैक्षणिक वापरावर नियंत्रण ठेवताना शिक्षकांसाठी एआयचा उत्पादकतेसाठी वापर करण्याचा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये एआय वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी वेग आला आहे. लॉस एंजेलिससह काही इतर शालेय जिल्हे एआय संदर्भातील त्यांच्या धोरणांचा आढावा घेत आहेत.
 
चॅटजीपीटी वर यापूर्वीही बंदी
न्यू यॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये एआय संदर्भातील निर्बंध नवीन नाहीत. चॅटजीपीटी लोकप्रिय झाल्यानंतर २०२२ मध्ये शाळांनी त्याच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. नंतर ही बंदी हटवण्यात आली आणि एआय तंत्रज्ञानाचा नियंत्रित शैक्षणिक वापर करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली. आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या एआय वापरावर वर्षभराची स्थगिती लागू केल्याने तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर नेमका किती आणि कोणत्या पद्धतीने असावा, याबाबत अमेरिकेत सुरू असलेली चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.