नवी दिल्ली,
bccis major statement regarding rohit टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना बीसीसीआयच्या बैठकीनंतर काहीसा विराम मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्मा चांगला खेळत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सध्या तरी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी रोहितच्या कामगिरीचा उल्लेख करत इंटरनेटवर पसरत असलेल्या बातम्यांकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले. त्यांनी रोहितच्या भवितव्याबाबत थेट कोणतेही वक्तव्य केले नसले तरी, त्याच्या सध्याच्या कामगिरीवरून तो क्रिकेट खेळत राहण्याची शक्यता कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. रोहितने चांगली कामगिरी सुरू ठेवली तर पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत त्याची कारकीर्द सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बैठकीला टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित नसल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले. विशेष म्हणजे आगरकर बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नव्हतेच, तसेच ते ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी झाले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता देवजित सैकिया यांनी ही बैठक अचानक आयोजित करण्यात आली होती आणि आगरकर वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगितले.
दरम्यान, बीसीसीआयकडून क्रिकेट संचालकाची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, देवजित सैकिया यांनी अशी कोणतीही नियुक्ती होणार असल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले. बैठकीला कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल तसेच टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर उपस्थित होते. दोघांनीही बैठकीत आपली मते मांडल्याचे सांगण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जाणे पसंत केले. त्यांच्या बैठकीच्या ठिकाणी येण्याचे आणि तेथून बाहेर पडण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.