मुंबई
bigg boss 20 छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 20वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिझनचा ग्रँड प्रीमियर येत्या 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून, यंदाही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रीमियरची तारीख जवळ येत असताना संभाव्य स्पर्धकांच्या नावांवरून सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वात चर्चेला उधाण आलं आहे.
यंदाच्या सिझनसाठी तब्बल 22 नावांची चर्चा सुरू असून, त्यापैकी सुमारे 15 जणांची नावं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वरित सात नावांबाबत अद्याप अंदाज आणि चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ग्रँड प्रीमियर होईपर्यंत संभाव्य स्पर्धकांच्या यादीत बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चर्चेत असलेल्या नावांमध्ये टीव्ही कलाकार, सोशल मीडिया स्टार, डिजिटल क्रिएटर्स, गायक तसेच विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असल्याचं विविध रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
मृदुल तिवारी आणि शहबाज बदेशा यांची नावं सध्या विशेष चर्चेत आहेत. याशिवाय करण वाही, अरिश्फा खान, अम्रपाली दुबे, माही विज आणि मेरी कोम यांच्याही नावांची संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चा आहे. मात्र, या नावांवर निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही.
या संपूर्ण यादीतील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे ऑलिम्पिक बॉक्सर मेरी कोम यांचं. मेरी कोम ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळापासून सुरू आहे. हे वृत्त खरं ठरल्यास क्रीडा क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला रिअॅलिटी शोमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना मोठी संधी मिळू शकते. त्याचबरोबर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आणि होस्ट करण वाहीचं नावही चर्चेत आहे. करणची मोठी फॅन फॉलोइंग असल्याने त्याच्या सहभागाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
सोशल मीडिया स्टार अरिश्फा खान आणि भोजपुरी अभिनेत्री अम्रपाली दुबे यांची नावंही संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आहेत. याशिवाय निती टेलर, पार्थ समथान, प्रणाली राठोड, माही विज, गीता बसरा, सुनील पाल आणि दीपिका सिंह यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये छोट्या पडद्यापासून सोशल मीडिया आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांतील चेहरे एकाच घरात दिसणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस 20’ केवळ संभाव्य स्पर्धकांच्या नावांमुळेच चर्चेत नाही, तर यंदा आणण्यात आलेल्या नव्या ट्विस्टमुळेही शोबाबत उत्सुकता वाढली आहे. निर्मात्यांनी यावेळी ‘एक्स्ट्रा जीवनदान’ हा ट्विस्ट आणल्याची माहिती आहे. त्यामुळे घरातील एलिमिनेशनची प्रक्रिया अधिक मनोरंजक आणि अनपेक्षित होण्याची शक्यता आहे.
याशिवाय दोन संभाव्य स्पर्धकांपैकी एका व्यक्तीची निवड थेट प्रेक्षकांच्या मतदानातून केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिया अहीर आणि लव्ह गिल यांच्यापैकी कोणाला ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश मिळणार, हे प्रेक्षकांच्या मतांवर अवलंबून असेल. त्यामुळे ग्रँड प्रीमियरपूर्वीच स्पर्धकांची यादी आणि नव्या ट्विस्टमुळे ‘बिग बॉस 20’ची उत्सुकता आणखी वाढली आहे.