नवी दिल्ली,
central government offices in delhi राजधानी दिल्लीत होणाऱ्या BRICS शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्लीतील केंद्र सरकारची सर्व कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. BRICS परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन करावे लागणार असल्याने तसेच नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत मंडपम येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १८वे BRICS शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी BRICS सदस्य आणि भागीदार देशांचे नेते तसेच आउटरीचसाठी आमंत्रित प्रतिनिधी दिल्लीत दाखल होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय, सुरक्षा आणि वाहतूकविषयक तयारी सुरू आहे.
११ सप्टेंबर हा शुक्रवार असल्याने त्या दिवशी केंद्र सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल. त्यानंतर १२ सप्टेंबर शनिवार आणि १३ सप्टेंबर रविवार असल्यामुळे दिल्लीतील केंद्र सरकारची कार्यालये सलग तीन दिवस बंद राहतील. या काळात राजधानीतील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक व्यवस्थेतही बदल होण्याची शक्यता असून, BRICS प्रतिनिधींच्या हालचालींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदा भारत BRICSचे अध्यक्षपद भूषवत असून, १ जानेवारी २०२६ रोजी भारताने चौथ्यांदा या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. यापूर्वी भारताने २०१२, २०१६ आणि २०२१ मध्ये BRICSचे अध्यक्षपद सांभाळले आहे. २०२६ हे वर्ष BRICSच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्यानेही विशेष महत्त्वाचे ठरत आहे.
भारताच्या BRICS अध्यक्षपदाची यंदाची संकल्पना ‘Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability’ अशी आहे. या अध्यक्षपदाच्या काळात २५ हून अधिक शहरांमध्ये ३५० हून अधिक बैठका आणि उच्चस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. आता दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या १८व्या शिखर परिषदेकडे जगाचे लक्ष लागले आहे.