दिपकेच्या सीजेपीमध्ये बंड; मनीष ब्रह्मभट्ट यांनी काढला नवा पक्ष!

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
 
अहमदाबाद
CJP Controversyकॉकरोच जनता पार्टीमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, मूळ आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांनी आता स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभारले आहे. अहमदाबादचे रहिवासी मनीष ब्रह्मभट्ट यांनी गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली. जंतर-मंतरवरील आंदोलनात सक्रिय भूमिका बजावलेल्या ब्रह्मभट्ट यांनी मूळ ‘कॉकरोच जनता पार्टी’वर गंभीर आरोप केले. आंदोलनानंतर पक्षाची दिशा बदलली असून, तो आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला आहे, असा दावा त्यांनी केला. अभिजीत दीपके यांनी मूळ कार्यकर्त्यांना दूर ठेवून स्वतःची टीम उभी केल्याचाही आरोप त्यांनी केला.
 

cjp 
ब्रह्मभट्ट यांच्या म्हणण्यानुसार, अभिजीत दीपके यांनी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याशी चर्चा न करता घरबसल्या १२ जणांची टीम तयार केली. या नियुक्त्यांसाठी कोणते निकष वापरण्यात आले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या टीममध्ये आम आदमी पार्टीशी संबंधित आठ जणांसह स्वतःच्या मैत्रिणी आणि महाविद्यालयीन मित्रांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक राज्यातून पाच प्रतिनिधी असावेत, अशी मूळ मागणी होती. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र, ही मागणी मान्य न करता मनमानी कारभार सुरू झाल्याचा आरोप ब्रह्मभट्ट यांनी केला. नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शीख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावरही ब्रह्मभट्ट यांनी तीव्र टीका केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष स्थापन करताना जनतेच्या पसंतीनुसार उमेदवारांना तिकीट देण्याचे आणि स्वराज्य आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र सत्ता मिळाल्यानंतर स्वराज्य कायदा बाजूला ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आता पुन्हा उभ्या राहिलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अभिजीत दीपके यांच्यासोबतच्या करारातून ते आंदोलन ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आम आदमी पार्टीशी संबंधित व्यक्तींना सीजेपीमध्ये समाविष्ट करण्यासाठीच तडजोडी करण्यात आल्याचा दावा करत, या सर्व कारणांमुळे स्वतंत्र ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रह्मभट्ट यांनी स्पष्ट केले.