वाशीम,
cm baliraja pandan मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्त्याची कामे प्राधान्याने दर्जेदार करुन व जलदगतीने मार्गी लावावी. पांदण रस्त्याच्या अडचणीबाबत असलेल्या शेतकर्यांच्या तक्रारी त्वरीत मार्गी लावाव्यात. पांदण रस्त्याच्या कामात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना आ. श्याम खोडे यांनी अधिकार्यांना केल्या.मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेची विधानसभास्तरीय आढावा बैठक मंगरुळनाथ येथील तहसील कार्यालयात २ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मंगरुळनाथ तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठक समितीचे अध्यक्ष आमदार श्याम खोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला समितीचे सह अध्यक्ष सुभाष नानोटे, समिती सदस्य पाडुरंग कोठाळे, बाळू पाटील, विनोद जाधव, भेंडेकर, समितीचे सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी रवी काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, तहसीलदार निलेश पळसकर, अनासुने, गटविकास अधिकारी सारिका कारले, सोनवणे, सार्वजनिक बांधकाम उपभियंता चेके, जिल्हा परिषद अभियंता खोडवे, तालुका कृषी अधिकारी इंगोले, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख वाशीम व मंगरूळनाथ यांच्यासह संबंधित अधिकार्यांची उपस्थिती होती.
सभेमध्ये मंगरूळनाथ तालुयातील मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता तसेच तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्यामार्फत मोजणी झालेले शेत पांदन रस्तेबाबत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी तालुयात सदर योजने अंतर्गत कामे सुरू करण्याबाबत आ. श्याम खोडे यांनी सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश दिलेत. आगामी सेवा पंधरवडा अंतर्गत प्रत्येक गावात बळीराजा पांदन रस्ता योजनेअंतर्गत रस्त्याची माहिती देणे व नवीन कामे प्रस्तावित करण्याबाबत ची माहिती सुद्धा सदर सभेत देण्यात आली.