कोरडा दुष्काळ जाहीर करा:शेतीच्या बांधावर आंदोलन

पिके करपली, शेतकरी संतप्त

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अकोला,
declare a dry drought पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली असताना शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासना पर्यंत पोहचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने गुरुवार, ३ रोजी बोरगांव खुर्द– डाबकी जहागीर मार्गालगत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चार तास आंदोलन केले.नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा १३ सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी दिला.
 
declare a dry drought
 
यंदा खरीप हंगामात एल निनोचा प्रभाव असल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिके पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हाताला व डोक्याला काळ्या फिती बांधून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलनस्थळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा ठेवण्यात आला. संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोरगाव खुर्द, डाबकी जाहगीर, पातुर नंदापूर, सोनखास, कव्हळा, जाहगीर, दुधलम, कुरणखेड, बोरगाव मंजू, जवळा बु, कोळंबी, यांसह परिसरात शेतकरी उपस्थित होते.
 
या आहेत प्रमुख मागण्या
-जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा
- नुकसानग्रस्त शेताचे प्रत्यक्ष पंचनामे करावेत
- प्रति हेक्टर १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी
- पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा
- जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- जिल्हाधिकारी, कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी.