मुंबई,
deool band 3 in america ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ‘राजा शिवाजी’नंतर चर्चेत आलेल्या ‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला होता. सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील भूमिकेमुळे मोहन जोशी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. विशेष म्हणजे, ‘देऊळ बंद 2’च्या अखेरीस पुढील भागाची झलक देण्यात आली होती. त्यामुळे आता ‘देऊळ बंद 3’ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनात आणि अभिनयातून साकारलेल्या ‘देऊळ बंद 2’मध्ये मोहन जोशी, स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता तिसऱ्या भागाची कथा भारताबाहेर नेली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘देऊळ बंद 3’चे कथानक अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता असून, चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.
पोस्टनुसार, प्रवीण तरडे पुन्हा एकदा ‘देऊळ बंद’ या फ्रँचायझीसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ‘देऊळ बंद 3’साठी कलाकारांची निवड, अंतिम कथा आणि चित्रपटाच्या निर्मितीचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रिकरण सुरू होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. दरम्यान, ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला होता आणि जवळपास महिनाभर चित्रपटगृहांमध्ये सुरू होता. प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता तिसऱ्या भागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.