अनिल कांबळे
नागपूर,
explosive material arrived in nagpur चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्या संशयिताचा तपास करताना लकडगंज पोलिसांच्या हाती स्फोटक साहित्य (जिवंत डेटोनेटर आणि १२ मीटर डेटोनेटर वायर) लागल्याने खळबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून रेल्वेने हे स्फोटक साहित्य नागपुरात आणल्याचे समोर आले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) डेटोनेटरची तपासणी केली. त्यानंतर नागपूर एटीएसनेही लकडगंज पोलिस ठाण्यात धाव घेत प्राथमिक माहिती घेतली. जप्त केलेले डेटोनेटर तांत्रिक तपासणीसाठी पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो)कडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (३५, रा. खुर्सतीपूर, जि. बालोद, छत्तीसगड) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो चांद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणीत कंत्राटदारामार्फत रोजंदारीवर काम करीत असल्याचे चौकशीत समोर आले.

लकडगंजचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना १ सप्टेंबर रोजी अझमशाह चौक परिसरात एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार लकडगंज पोलिसांच्या पथकाने सापळा रचून विश्वकर्माला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून तीन चोरीचे मोबाईल मिळाले. यामध्ये आयटेल कंपनीच्या मोबाईलचा समावेश आहे. मात्र, पोलिसांनी त्याची झडती घेतली असता दोन जिवंत डेटोनेटर आणि १२ मीटर डेटोनेटर वायर आढळून आली. त्यामुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाला पाचारण करून डेटोनेटरची तपासणी करण्यात आली. दोन्ही डेटोनेटर जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने ते सुरक्षितरीत्या निकामी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून पॅक व सील केले.
थकीत मजुरीच्या रागातून चोरी?
प्राथमिक चौकशीत विश्वकर्माने कंत्राटदाराने कामाची मजुरी न दिल्याने संतापातून त्याचे मोबाईल चोरल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्याचवेळी खाण परिसरातून डेटोनेटरही घेतल्याचे त्याने कथितरीत्या कबूल केले. त्यानंतर वरोरा येथून रेल्वेने तो चोरीच्या मोबाईलसह जिवंत डेटोनेटर घेऊन नागपुरात आला.
डेटोनेटर कुठून मिळाले?
जिवंत स्फोटके नागपूर शहरात आणल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात येऊन प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान, डेटोनेटर नेमके कुठून मिळाले, ते डब्ल्यूसीएलच्या खाणीतून चोरी करण्यात आले होते का?, नागपुरात आणण्यामागे नेमका उद्देश काय होता?, तसेच आरोपीचा स्फोटकांच्या बेकायदा वाहतुकीशी अन्य कोणता संबंध आहे का?, याचा तपास सुरू आहे.explosive material arrived in nagpur डब्ल्यूसीएलचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, स्फोटक पदार्थ अधिनियम, स्फोटक अधिनियम तसेच अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या पथकाचे कौतुक
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सूरज मडावी आणि अरविंद तायडे यांच्या पथकाने केली.चोरीच्या मोबाईलच्या तपासातून जिवंत स्फोटके उघडकीस आणल्याने पोलिसांच्या सतर्कतेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.