नागपूर,
grand senior citizens gathering नागपूर पोलीस भरोसा सेलच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त हा भव्य मेळावा होणार असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
पोलीस लाईन टाकळी येथील नागपूर पोलीस भरोसा सेल कार्यालयाच्या वतीने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे हक्क आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीचे मोठ्या प्रमाणावर बळी ठरत असल्याने त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक वर्षा मते यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना भेडसावणाऱ्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांमध्ये पोलीस प्रशासनाकडून कोणत्या स्वरूपाची मदत मिळू शकते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, वैयक्तिक सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर व सामाजिक हक्क याबाबत विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे हा मेळावा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या बैठकीला डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, रमेश सातपुते, सुरेश डोरले, सुरेश रेवतकर, मधुकर दहिकर, सुरेश बांधे, काशीनाथ धांडे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी डॉ. दीपक शेंडेकर यांनी पोलीस निरीक्षक वर्षा मते तसेच रोशनी बोरकर यांचे विशेष आभार मानले.
सौजन्य : दीपक शेंडेकर, संपर्क मित्र