तळेगाव (श्या.पं.),
e peek pahani आष्टी तालुक्यात वाघाच्या वाढत्या वावराने केवळ शेतकरीच नव्हे तर ई-पीक पाहणीच्या कामावरही संकट ओढवले आहे. वडाळा, वधपूर, भडकुंभ तसेच सातापूर परिसरांत वाघाचा वावर असल्याने शेतशिवारात जाऊन ई-पीक पाहणी करणे जीवघेणे ठरू शकते, अशी भीती व्यक्त करीत ई-पीक पाहणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे पाहणीच्या कामातून सुटका करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदानातून केली आहे.

गेल्या महिनाभरापासून वडाळा, वधपूर, भडकुंभ आणि सातापूर परिसरात वाघाचा संचार आहे. आष्टी तालुक्यातील नरसिंगपूर शिवारात वाघाने एका शेतकर्याचा बळी घेतला. त्यानंतर वडाळा व वधपूर परिसरांत दोन गायी व दोन जनावरांवर हल्ला करून ठार केले. भांबोरा परिसरातही वाघाचा मुक्त संचार आहे. विशेष म्हणजे, वडाळा गाव सावंगा पिपळा जंगलाच्या अगदी जवळ असल्याने परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतमजूर शेतात जाण्यास तयार नाही. गावात सकाळ-संध्याकाळ वनविभागाचे वनरक्षक व कर्मचारी गस्त घालत असून, नागरिकांना एकट्याने शेताकडे जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. दररोज शिवारात वाघाच्या पायांचे ठसे दिसत असल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याबाबत महसूलसेवक दीपक वानखेडे, वडाळा येथील पोलिस पाटील पूनम भोंड, वधपूर येथील पोलिस पाटील वैशाली काळे आणि सातापूर येथील पोलिस पाटील राजेश पोटे यांनी निवेदन दिले.
अशा परिस्थितीत ई-पीक पाहणीसाठी शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची भावना कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. ई-पीक पाहणीचे काम करताना वाघाचा हल्ला झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? शासनाने एकीकडे ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असताना दुसरीकडे वाघाच्या दहशतीमुळे कर्मचारीच शेतात जाण्यास धजावत नसतील तर सुरक्षिततेची व्यवस्था न करता ई-पीक पाहणी कशी होणार? असा सवाल तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून विचारला आहे. आम्हाला नेमून दिलेल्या गावांमध्ये ई-पीक पाहणीचे काम करता येणार नाही. आम्हाला या कामातून सवलत द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.