मुंबई
home minister महाराष्ट्राच्या संस्कृतीशी घट्ट नातं जपत नव्या शक्यता आणि नव्या वाटांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा संदेश ‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या संकल्पनेतून झी मराठी आपल्या कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. याच विचाराला पुढे नेत ‘होम मिनिस्टर’नेही आता एक अनोखा टप्पा गाठला आहे.
‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाच्या सुरुवातीला नेहमीच्या फ्लेक्सऐवजी कापसे पैठणी यांनी साकारलेल्या खास पैठणी साडीचा तब्बल २० फूट उंच आणि ४० फूट रुंद होर्डिंग उभारण्यात आलं आहे. या होर्डिंगसाठी प्रत्यक्ष पैठणी साडीचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध आणि पारंपरिक संस्कृतीचं प्रतीक असलेल्या पैठणीला अशा अनोख्या पद्धतीने जाहिरातीचा भाग बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
या आगळ्या उपक्रमाला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत असून, ‘होम मिनिस्टर’चे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनीदेखील या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. ‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टी वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचं या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.गेल्या २० वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ने महाराष्ट्रातील घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदेश बांदेकर यांच्या खास शैलीतील सूत्रसंचालनातून या कार्यक्रमात महिलांचे अनुभव, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यातील खास क्षण प्रेक्षकांसमोर आणले जातात. या दोन दशकांच्या प्रवासात ‘होम मिनिस्टर’ने जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. या काळात आतापर्यंत सुमारे ७,५०० पैठणी साड्या महिलांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या आठवड्यात ‘होम मिनिस्टर’मध्ये भाऊजी कोल्हापुरातील वहिनींची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विविध खेळ खेळताना भाऊजी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या आयुष्यातील खास आणि रंजक गोष्टी जाणून घेणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वहिनींसोबतचा हा विशेष भाग प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे.