मुंबई
hunkar the roar एखादा गंभीर आरोप सामर्थ्यवान व्यक्तींना हादरवून सोडतो आणि संपूर्ण व्यवस्थेलाच सत्याचा सामना करण्यास भाग पाडतो, तेव्हा नेमकं काय घडतं? याच प्रश्नाचा वेध घेणारी उत्कंठावर्धक मालिका ‘हुंकार: द रोअर’ लवकरच जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १७ वर्षांच्या मीनू रावतने आदरणीय पंथप्रमुख सुनील चकोसी ऊर्फ “बापजी” यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुरू होणाऱ्या हाय-स्टेक्स तपासाची ही कथा असून, या प्रकरणाचे पुढे राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटताना पाहायला मिळणार आहेत.
करण डी कपाडिया, नित्या मेहरा आणि हिराज मारफतिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या मालिकेचा प्रीमियर २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. फातिमा शेख, अर्जुन माथूर, मोहम्मद जीशान अयुब, अनीत पड्डा, रघुवीर यादव आणि राम कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये एकत्र दिसणार आहेत.
मालिकेचा टीझर जसजसा पुढे सरकतो, तसतशी एसीपी जसलीन सिंग सोनी, संघर्ष करणारा वकील भालेराव आणि खंबीर पत्रकार अमिताभ यांच्या प्रवासाची झलक समोर येते. जमिनीवर सुरू असलेला पोलीस तपास, न्यायालयातील कायदेशीर लढाई आणि प्रसारमाध्यमांमधील संघर्ष अशा तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर हे तिघेही एकाच सत्याच्या शोधासाठी लढताना दिसणार असल्याचे टीझरमधून संकेत मिळतात.
या प्रकरणात सत्ता, प्रभाव आणि जनमानसातील प्रतिमा पणाला लागलेली असताना, ‘हुंकार: द रोअर’मध्ये पोलीस तपासाची तीव्रता, कायदेशीर नाट्याची गुंतागुंत आणि मीडिया ट्रायलचे स्वरूप यांचा संगम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका केवळ एका आरोपाच्या तपासाची कथा न राहता, सत्य समोर आणण्याच्या प्रक्रियेत व्यवस्था आणि प्रभावशाली व्यक्तींसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांचाही वेध घेणार आहे.बिर्ला स्टुडिओ आणि अप्लॉज एंटरटेनमेंट यांनी पर्पल पेबल पिक्चर्सच्या सहकार्याने आणि मान्गाता फिल्म्सच्या प्रॉडक्शनअंतर्गत या मालिकेची निर्मिती केली आहे. करण डी कपाडिया आणि नित्या मेहरा यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. रहस्य आणि उत्कंठेने भरलेली ‘हुंकार: द रोअर’ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासोबतच पडद्यामागे नेमकं काय दडलं आहे, याचा विचार करायला भाग पाडणार असल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे.