माधुरी पवार ऑनलाइन छळामुळे त्रस्त

‘न्याय आणि सुरक्षिततेसाठी मदत करा’, राज ठाकरेंसह मुख्यमंत्र्यांकडे धाव

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
मुंबई
madhuri pawar ‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोमधून विजेतेपद मिळवत आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री माधुरी पवार सध्या गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सातत्याने त्रास दिला जात असून, या प्रकारामुळे मानसिक तणावासोबतच सुरक्षेचीही चिंता वाटत असल्याचा दावा माधुरीने सोशल मीडियावर भावूक व्हिडीओ पोस्ट करत केला आहे.
 

madhuri pawar troubled by online harassment, seeks justice and safety from maharashtra leaders 
गेल्या अनेक वर्षांपासून कला आणि अभिनयाच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितले. सोशल मीडियामुळे कलाकारांना कमी वेळेत मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे ‘माधुरी पवार’ हे नावही प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच तयार झाले असल्याचे ती म्हणाली. मात्र, सध्या याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचता येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली.
गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला या प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे माधुरीने सांगितले. सोशल मीडिया पोस्टखाली अत्यंत घाणेरड्या आणि अपमानास्पद कमेंट्स केल्या जात असल्याचा आरोप तिने केला आहे. याशिवाय तिचे विकिपीडिया पेज हटवण्यात आल्याचे, तसेच काही फॅन पेजेस हॅक करून त्यातील काही पेजेस डिलीट करण्यात आल्याचेही तिने नमूद केले. तिच्या वर्किंग नंबरवर ‘कॉल बॉम्बिंग’ करण्यात येत असल्याने सतत फोन वाजत राहतो आणि त्याचा आपल्या कामावरही परिणाम होत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.
या सर्व प्रकारामागे नेमके कोण आहे आणि असे का केले जात आहे, याची माहिती आपल्याला नसल्याचे माधुरीने स्पष्ट केले. मात्र, या घटनांमुळे मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे तिने सांगितले. ‘बाहेर जाताना सुरक्षिततेची चिंता वाटते, कोण काय बोलेल किंवा काही करेल का, असे विचार सतत सुरू असतात,’ असे म्हणताना माधुरी भावूक झाली.
या प्रकरणी माधुरीने सायबरकडे तक्रार केल्याचेही तिने सांगितले. मात्र, तक्रारीनंतरही त्रास थांबलेला नसल्याने तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची कळकळीची मागणी केली आहे.
यानंतर माधुरीने मनसे चित्रपट सेनेच्या कार्यालयातून आणखी एक व्हिडीओ शेअर केला. राज ठाकरे यांना आपण पत्र दिल्याचे तिने सांगितले. तसेच शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांचीही भेट घेतल्याचे तिने स्पष्ट केले. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याचा लवकरात लवकर छडा लावला जाईल, असा विश्वास त्यांच्याकडून मिळाल्याचे माधुरीने सांगितले.
माधुरीने आपल्या पोस्टमधूनही madhuri pawar  मदतीची विनंती केली आहे. ‘मला न्याय आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या मदतीची गरज आहे. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स करून मला सतत टार्गेट केले जात आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न होत आहेत. माझे Wikipedia पेजदेखील डिलीट करण्यात आले आहे आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सना हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मला जाणवत आहे. एक मुलगी म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आणि भीतीदायक आहे. मी कोणाच्याही नुकसान करू इच्छित नाही; मला फक्त सत्य समोर यावे, माझी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी आणि या प्रकारामागे कोण आहे याची योग्य चौकशी व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,’ असे तिने म्हटले आहे.
‘महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्रा ताई पवार, आपण माझ्यासारख्या एका कलाकाराची व्यथा समजून घेऊन मला योग्य ती मदत आणि संरक्षण मिळवून द्यावे,’ अशी मनापासून विनंतीही माधुरीने केली आहे.