हैदराबाद,
major upheaval in telangana congress तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले असून मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी मंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्यपालांकडे शिफारस पाठवण्यात आली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने केलेल्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. सुरेखा यांची मुलगी कोंडा सुष्मिता पटेल हिने रेवंत रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर पक्षांतर्गत वाद अधिक तीव्र झाला होता.

ऑगस्टमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात सुष्मिता पटेल हिने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याविरोधात वक्तव्ये केली होती. त्यानंतर काँग्रेसमधील काही आमदारांनी कोंडा सुरेखा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, सुरेखा यांनी आपल्या मुलीची मते वैयक्तिक असून तिच्या वक्तव्यांसाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, रेवंत रेड्डी यांनी दिल्ली दौऱ्यात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे हा विषय मांडून सुरेखा यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.
पक्षांतर्गत दबाव वाढत असतानाही सुरेखा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. उलट पक्ष नेतृत्वाने आपल्यावर कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले. बुधवारी त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्याआधी पक्षाच्या शिस्तपालन समितीने दोन्ही नेत्यांविरोधात कारवाईची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर अखेर रेवंत रेड्डी यांनी सुरेखा यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींसोबतच तेलंगणा नियोजन मंडळाशी संबंधित महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे. चिन्ना रेड्डी यांची नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून शिस्तपालन समितीने त्यांच्यावरही कारवाईची शिफारस केली होती. त्यांच्या जागी गडवाल विजयलक्ष्मी यांची तेलंगणा नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर वारंगल जिल्ह्यातील तीन ओबीसी महिलांना विविध मंडळे आणि महामंडळांच्या अध्यक्षपदांची जबाबदारी देण्यात आली आहे. गडवाल विजयलक्ष्मी यांची तेलंगणा नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी, नेरेला शारदा यांची तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, तर माजी राज्यसभा खासदार जी. सुधा राणी यांची काकतीय शहरी विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणा काँग्रेसमधील हा वाद गेल्या महिन्यापासून चर्चेत असून, सुरेखा यांच्या मुलीच्या वक्तव्यामुळे त्याला आणखी वेग आला होता.