मानोरा,
manora bypass demand अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वर वसलेले मानोरा हे महत्त्वाचे व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. गेल्या काही वर्षात शहरातून जाणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, विशेषतः जड वाहने, ट्रक आणि प्रवासी बस यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी मानोरा शहराबाहेरील परिसरातून जाणारा योग्य नियोजित बायपास रस्ता मंजूर करावा, अशी आग्रही मागणी व्यापारी संघटना मानोरा चे अध्यक्ष राजू गुल्हाने यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार संजय देशमुख यांच्यामार्फत विनंती अर्जाद्वारे केली आहे.
व्यापारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानोरा शहरातून जाणारा हा एकच मुख्य रस्ता असल्यामुळे शहरातील सर्वच मोठे उत्सव याच रस्त्याने साजरे केले जातात. कावड यात्रा, श्रीराम नवमी मिरवणूक, संत सेवालाल महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बिरसा मुंडा जयंती, मोहरम, रहमान शाह बाबा संदल मिरवणूक, गणपती विसर्जन, दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक तसेच विविध राजकीय व सामाजिक उत्सव याच रस्त्याने जातात. त्यामुळे नेहमीच शहरात वाहतूक कोंडी होते व अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शयता आहे. जर शहराच्या बाहेरील परिसरातून बायपास रस्ता तयार झाल्यास शहरातील गर्दी कमी होईल, अकोला ते नांदेड या मार्गावरील वाहतुकीस गती मिळेल, प्रवासाचा कालावधी कमी होईल, अपघाताचे प्रमाण घटेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. या निवेदन अर्जावर अध्यक्ष राजू गुल्हाने, उपाध्यक्ष श्याम हेडा, सचिव कादर सेठ लंघा यांच्या स्वाक्षर्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी मानोरा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर व्यापारी व निवासी नागरिकांनी केलेले अतिक्रमण सात दिवसात हटविण्याच्या नोटिसा सुद्धा पाठविलेल्या असल्याने शहरातील हा महामार्ग चर्चेत आलेला आहे.