मुंबई
leena bhagwat मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रुग्णालयातील फोटो शेअर करत लीना यांनी त्यांच्या आवाजासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आवाजावर ताण येत असल्याने नुकतीच एक छोटी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्या रंगभूमीपासून, विशेषतः गाजलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाच्या प्रयोगांपासून दूर राहणार आहेत.
‘मेरी आवाज ही पहचान है...’ या गाण्याचा उल्लेख करत लीना यांनी कलाकारासाठी आवाजाचे असलेले महत्त्व आपल्या पोस्टमधून भावनिक शब्दांत व्यक्त केले. “एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते,” असे सांगताना त्यांनी मागील वर्षभरापासून ‘आमने सामने’ या नाटकाचे प्रयोग सातत्याने हाऊसफुल्ल जात असल्याचे नमूद केले. नाटक पाहताना प्रेक्षकांना जितका आनंद मिळतो, तितकीच मजा कलाकारांनाही प्रयोग करताना येते, असेही त्यांनी म्हटले. ‘आमने सामने’मधील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांनी दिलेले प्रेम त्या कधीही विसरू शकणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लीना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “मेरी आवाज ही पेहचान है.. आता पुढचे काही दिवस ‘कसं वाटलं नाटक?’ असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय मेरी आवाज ही पेहचान है. एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून आमने सामनेचे प्रयोग लागोपाठ हाऊसफुल जातायत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते तेवढीच आम्ही कलाकारसुद्धा करतो. आमने सामनेमधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती.”
आवाजावर ताण जाणवू लागल्यानंतर लीना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करत होत्या. मात्र, अखेरीस डॉक्टरांनी त्यांना सक्त ताकीद देत आवाजाची ओळख आणि ताकद टिकवण्यासाठी छोटी प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर काल ही प्रक्रिया पार पडली. या काळात डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम, मंगेश तसेच नाटकाची टीम पूर्ण वेळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीने उभी राहीन आणि पुन्हा म्हणेन ‘कसं वाटलं नाटक?’ तोपर्यंत एक छोटासा मध्यांतर.. लवकरच भेटू आमने सामने,” असे म्हणत लीना यांनी चाहत्यांना पुन्हा रंगभूमीवर परतण्याचे आश्वासन दिले आहे.
लीना भागवत यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री मुक्ता बर्वेने “काळजी घे आणि छान बरी हो. आम्ही सगळे तुझे चाहते, तुझा आवाज ऐकायला आतुर आहोत. खूप प्रेम,” अशी प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री अमृता देशमुखने “लवकर बरी हो ताई. मला आई-बाबांना पाठवायचं आहे नाटक बघायला,” असे लिहिले. अभिनेता सुबोध भावेनेही “लीना पुन्हा नव्या जोमाने उभी राहशील, मोरया,” असे म्हणत त्यांना धीर दिला आहे.