मॉडेलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया

बॅलेट पेपरद्वारे मतदान

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
कारंजा ( घा.),
model school स्थानिक मॉडेल हायस्कूल येथे विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभवतान आली. या प्रक्रियेत अगदी खर्‍याखुर्‍या निवडणुकीसारखाच उत्साह विद्यार्थ्यांमध्ये होता. इच्छुक विद्यार्थ्यांपैकी ५ मुली व ३ मुले अशा ८ विद्यार्थ्यांनी शालेय प्रतिनिधीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांना आठ दिवस प्रचाराचा वेळ देण्यात आला. उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्याद्वारे शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आश्वासनं दिली. काही विद्यार्थी उमेदवारांनी प्रचार पत्रक आणि बिल्ले याची छपाई करून त्याचे वाटप केले.
 

model school 
 
 
शालेय प्रतिनिधी निवडणुकीकरिता मुलींच्या प्रवर्गातून संगम टेशन बारंगे, तेजल अनिल बोडखे, गौरी टीकाराम किनकर, इशिका दिलीप देशमुख, इशिका राजू डोंगरे तर मुलांच्या प्रवर्गातून दयाशंकर दिलीप बोडखे, दुर्गादास संदीप टोपले, अंशुमन दीपक ऊईके हे उमेदवार रिंगणात होते.
प्रत्यक्ष मतदान घेण्याकरता शिक्षकांची तीन पथके तयार करण्यात आली. काही शिक्षकांना केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि शिपाई म्हणून जबाबदारी देण्यात आली. मतदान प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण साहित्य वाटप करण्यात आले. पाचवी ते दहावीच्या १११० विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करून मतदानाकरिता दोन मतदान केंद्र तयार करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर शालेय वेळात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० पर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदार यादीत नाव शोधणे, मतदाराची ओळख पटविणे, आधार कार्ड क्रमांकाची किंवा दाखल खारीज क्रमांकाची मतदार नोंदवहीत नोंद घेणे, स्त्री-पुरुष नोंद, मतदार चिट्टी देणे, डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावणे, मतदाराला मतदान कक्षात पाठविणे, गोपनीय पद्धतीने बॅलेट पेपरवर उमेदवाराच्या नावापुढे शिक्का मारणे, आदी मतदान प्रक्रियेचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया दरम्यान उपविभागीय अधिकारी विनायक पाटील यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील दोन्ही मतदान केंद्रावर निरीक्षण केले. १००६ विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक बजावला.model school यापैकी ७५ मते अवैध ठरली. १० फेर्‍यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. दहाव्या फेरी अखेर विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून घोषणा करण्यात आली.
मुलींच्या प्रवर्गातून इशिका डोंगरे ही उमेदवार ४० मतांनी विजय झाली तर मुलांच्या प्रवर्गातून दुर्गादास संदीप टोपले हा विद्यार्थी १०६ मतांनी विजयी झाला. प्राचार्य प्रवीण होरे व पर्यवेक्षक चंद्रशेखर गिर्‍हाळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विजयी शालेय प्रतिनिधींचे अभिनंदन केले.