चंद्रपूर,
mp pratibha dhanorkar जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असताना, गुरूवारी आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह अनेक प्रमुख विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बैठकच रद्द केली. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय शिस्तीचा अनादर करणार्या या सर्व बेजबाबदार अनुपस्थित अधिकार्यांना त्वरित ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे आदेश त्यांनी समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना दिले.
या बैठकीला विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांची विशेष उपस्थिती होती. बैठक रद्द केल्यानंतर खा. धानोरकर यांनी शहराच्या मुख्य रस्त्यांवर उतरून पाहणी केली आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणार्या खाजगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. ‘ट्रक टर्मिनल’साठी राखीव जागा शोधण्याचे आणि खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना स्वतःची पार्किंग व्यवस्था उभारण्यास सांगण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जनतेच्या जीवाशी खेळणारा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा खा. धानोरकर यांनी दिला. पुढील बैठकीत सर्व अधिकार्यांची उपस्थिती आणि वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देशही दिले.
या धडक कारवाईवेळी सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी रावसाहेब रगडे आदी उपस्थित होते.