मुंबई,
msrtc-conductorless-bus-serviceमहाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केवळ उत्पन्नवाढीवर भर न देता खर्चातही बचत करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याची गरज आहे
विशेषतः ‘विना वाहक’ बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्च कमी करण्यासोबतच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे, या तिन्ही बाबींवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करण्याची गरज सरनाईक यांनी व्यक्त केली. ‘केवळ तिकीट दरवाढ हा एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शाश्वत पर्याय नाही. प्रवाशांना चांगली सेवा देत उत्पन्न वाढविणे आणि त्याचवेळी खर्चात बचत करणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘विना वाहक’ बससेवेमुळे निवडक मार्गांवरील वाहकावरील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन करावे, असेही सरनाईक यांनी सांगितले.
एसटीचा आर्थिक तोटा कमी करण्यासोबतच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासपद्धती आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबवाव्यात, असा निर्देश त्यांनी दिला. प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ‘प्रवासी समाधानी तर एसटीची आर्थिक गाडी रुळावर’ या दृष्टिकोनातून भविष्यातील योजनांची आखणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.