मुंबई
mumbai-pune bullet train मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे दरम्यान लवकरच बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. मुंबईत वडापाव आणि पुण्यात बाकरवडी खाण्यासाठी दिवसातून दोनदा प्रवास करता येईल, अशा वेगवान कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत असल्याचे वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि पुण्यादरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा ३५० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. निवडणुकीच्या वेळी गणपती उत्सवासाठी ३०० पेक्षा अधिक विशेष गाड्या सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार यंदा ३५० विशेष गाड्या चालवण्यात येणार असून, गरज भासल्यास आणखी २० विशेष गाड्या सुरू केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि परिसरात रेल्वेशी संबंधित सुमारे १८ हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सव्वा तीन तासांत मुंबई-हैदराबाद प्रवास
मुंबई-पुणे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाबाबत बोलताना वैष्णव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचे काम रोखण्यात आले होते, असा दावा केला. त्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत वडापाव आणि पुण्यात जाऊन बाकरवडी खाण्यासाठी दिवसातून दोनदा प्रवास करता येईल, असा कॉरिडॉर तयार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय मुंबई ते हैदराबाद हा प्रवास अवघ्या सव्वा तीन तासांत पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुंबईत २३८ नव्या एसी लोकल
मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा अधिक आधुनिक करण्यासाठी सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसविणे ही रेल्वेची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल गाड्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्याबाबत रेल्वे बोर्डाने आदेश जारी केले आहेत. यातील पहिली एसी लोकल २०२७ मध्ये मुंबईत दाखल होईल, तर २०३० पर्यंत सर्व एसी लोकल मुंबईत धावतील, अशी माहिती त्यांनी दिली.
लोकल फेऱ्या ३५०० पर्यंत वाढवणार
मुंबईत सध्या दररोज सुमारे ३२०० लोकल फेऱ्या होत असून, ही संख्या ३५०० पर्यंत वाढविण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि लोकलमधील गर्दी कमी व्हावी, यासाठी १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंकडून घोषणेचे स्वागत
दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-पुणे बुलेट ट्रेनची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ही रेल्वेसेवा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत, “न होणारी कामेही ते करत आहेत,” असे शिंदे यांनी म्हटले आहे. कोकणवासीयांची जन्मभूमी आणि कर्मभूमी जोडणारी ही रेल्वेसेवा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.