कर्नाटक
bus accident कर्नाटकातील मैसूरु-बेंगळुरू एक्स्प्रेसवेवर केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसला गुरुवारी पहाटे अपघात झाला. रामनगरजवळील चन्नपट्टणा परिसरात प्रवाशांनी भरलेल्या बसने मालवाहू ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत बसच्या चालकासह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, चालक आणि वाहकासह सहा जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त बस कन्नूरहून बेंगळुरूकडे जात होती. ही सुपर डिलक्स एअर बस असल्याची माहिती आहे. गुरुवारी पहाटे हा अपघात घडला. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने दुर्घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालवाहू ट्रकच्या मागील भागावर बस आदळल्याने ही दुर्घटना घडली. मात्र, बसचा वेग किती होता, तसेच रस्त्यावरील अन्य कोणत्या परिस्थितीचा अपघाताला कारणीभूत ठरला का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांच्या प्रकृतीवर अधिकारी लक्ष ठेवून आहेत. या अपघातामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झालेली दुर्घटनाग्रस्त वाहने हटविण्याची कार्यवाही सुरू केली.दरम्यान, ऑगस्ट महिन्यातही बेंगळुरूजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला होता. बेंगळुरू-मैसूरु एक्स्प्रेसवेवर झालेल्या त्या दुर्घटनेत बसच्या चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला होता, तर २० प्रवासी जखमी झाले होते. गंभीर दुखापतींमुळे चालक आणि वाहकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मैसूरु-बेंगळुरू एक्स्प्रेसवेवरील आजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.