अनिल कांबळे
नागपूर
nagpur dj ban राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून, उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. पुणे आणि मुंबईतील गणेशोत्सवाची देशभरात चर्चा होत असतानाच, गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. पुण्यात लाऊडस्पीकर, डीजे तसेच ढोल-ताशांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असताना नागपुरात मात्र प्रशासनाने थेट डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हापोळा, ताजुद्दीनबाबा छब्बीसी, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सव मिरवणुकांदरम्यान मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम आणि मॉडीफाईड वाहनांमुळे वाद निर्माण होऊन तणाव निर्माण होतो. तसेच यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ व ध्वनी प्रदूषण नियम-२००० चे उल्लंघन होते. याशिवाय, बीम लाईट आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्यांना व आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो तसेच वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ अन्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे डीजे साऊंड, प्लाझमा साऊंड, प्रेशर मिडसिस्टीम, मॉडीफाईड साऊंड वाहने, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करण्यास पूर्ण मनाई आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपासून ते १ नोव्हेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत अंमलात राहील. सर्व कार्यक्रमांचे आयोजक, पदाधिकारी, साऊंड सिस्टीम चालक, वाहनधारक आणि बीम लाईट, लेझर लाईट संचालकांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.