नवी दिल्ली,
new india belgium partnership पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांची गुरुवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, अर्धसंवाहक, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारत आणि बेल्जियमचे संबंध ऐतिहासिक असल्याचे सांगताना मोदी यांनी पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये हजारो भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान आणि अँटवर्पमधील भारतीय समुदाय तसेच हिऱ्यांच्या व्यापाराचा विशेष उल्लेख केला. गेल्या दशकात दोन्ही देशांमधील भागीदारीने मोठी प्रगती केल्याचेही त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात भारत आणि बेल्जियम आधुनिक संरक्षण उपकरणांच्या विकासासाठी एकत्र काम करत असून, मोदी यांनी ‘झोरावर’ रणगाडा प्रकल्पाचा उल्लेख केला. दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी नियमित लष्करी देवाणघेवाण, प्रशिक्षण, संशोधन तसेच संरक्षण उत्पादनाच्या संयुक्त विकास आणि निर्मितीला चालना देण्याचे ठरवले आहे. स्वच्छ ऊर्जेसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जगातील मोठ्या हरित अमोनिया प्रकल्पांपैकी एका प्रकल्पावरही सहकार्य सुरू आहे. महत्त्वपूर्ण खनिजांची प्रक्रिया आणि पुनर्वापर वाढवण्यासोबतच अर्धसंवाहक क्षेत्रातही सहकार्य करण्याचे ठरले आहे. बेल्जियमचे तांत्रिक कौशल्य आणि भारताची मोठी बाजारपेठ व उत्पादन क्षमता यांचा उपयोग करून बेल्जियमच्या आयएमईसी संस्थेला भारताच्या अर्धसंवाहक परिसंस्थेशी जोडण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करणार आहेत.
जागतिक पातळीवरील संघर्ष आणि अन्न, इंधन तसेच पुरवठा साखळीतील अनिश्चिततेवरही मोदी आणि डी वेव्हर यांच्यात चर्चा झाली. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग कायम ठेवला असून, गेल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ नोंदवल्याचे मोदी यांनी सांगितले. युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्ष शांततापूर्ण मार्गाने संपवण्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांची समान भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिऱ्यांच्या व्यापारामुळे दीर्घकाळापासून जोडलेले भारत-बेल्जियमचे संबंध आता संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या व्यापक भागीदारीत रूपांतरित होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.