पाटोदा
farmers पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची टंचाई भेडसावत आहे, तर दुसरीकडे टोमॅटो, कोथिंबीर, भेंडी, मेथी, पालक, कोबी आणि वांगी यांसह विविध भाजीपाल्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. पाण्याची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका तसेच खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी केली. मात्र, पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो, भेंडी, वांगी, कोथिंबीर आणि मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांना पसंती दिली. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी देणे कठीण होत असून, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वीज, इंधन, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यातच शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्च आणखी वाढला आहे.
टोमॅटोचा शेतातच लाल चिखल
टोमॅटो उत्पादकांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असून, बाजारातील दर इतके घसरले आहेत की तोडणी, वर्गीकरण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविण्याचा खर्चही निघत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी न करता पीक शेतातच सोडून दिले आहे. मोठ्या मेहनतीने आणि खर्चाने उभे केलेले पीक आता उत्पन्नाचे साधन ठरण्याऐवजी तोट्याचे कारण बनले आहे.
“पाण्याची कमतरता असूनही मोठा खर्च करून टोमॅटोची लागवड केली. मात्र, दर एवढे घसरले की मार्केटमध्ये तो खरेदी करण्यास कुणी तयार नाही. तोडणीचा खर्चही निघत नसल्याने पीक जागेवरच सोडले,” अशी व्यथा पाटोदा येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी सुकदेव मॅगाने यांनी व्यक्त केली.
दोन लाखांचा खर्च, तरीही आर्थिक तोटा
कोबी उत्पादक शेतकऱ्यांनाही दरातील घसरणीचा मोठा फटका बसला आहे. ठाणगाव येथील कोबी उत्पादक शेतकरी सोमनाथ शेळके म्हणाले, “मी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली. दर कोसळल्याने केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा झाला
भाजीपाल्याला कवडीमोल भाव
टोमॅटोबरोबरच कोथिंबीर, मेथी, पालक, भेंडी आणि वांगी या भाजीपाल्यांचे दरही घसरले आहेत. कोथिंबिरीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावरच रोटर फिरविला आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च आणि घेतलेले कष्ट वाया जाण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने मका आणि सोयाबीन पिकांवर ताण दिसून येत आहे. पिकांची वाढ खुंटत असल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाची अनिश्चितता अशीच कायम राहिल्यास पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे.पिकांना पाणी देण्यासाठी वाढता वीज, इंधन आणि मजुरीचा खर्च करावा लागत असताना बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पावसाची अनियमितता आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वाढणारा खर्च आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी दुहेरी नव्हे, तर तिहेरी संकटाचा सामना करत आहे. आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटातही आणखी भर पडण्याची शक्यता आहे.