गडचिरोली,
gadchiroli हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या सुमारे 100 पुनर्वसन झालेल्या नागरिकांचा विशेष गट गुरुवारी बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाकडे रवाना झाला. गडचिरोली पोलीस प्रशासन, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पोलीस परिसरात झालेल्या फ्लॅग-ऑफ कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी, लॉयड्स मेटल्सचे अधिकारी तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिपचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी माजी नक्षलवादी नेता सोनू ऊर्फ मल्लोजुला वेणुगोपाल (भूपती) यांचीही उपस्थिती होती. नुकतीच त्यांची गोंडवाना विद्यापीठात ग्रामसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या गटाचे नेतृत्व असिन राजाराम ऊर्फ अनिल करीत आहेत. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर ते गेल्या जवळपास दोन वर्षांपासून लॉयड्ससोबत कार्यरत आहेत. यावेळी सोनू यांनी पुनर्वसन झालेल्या नागरिकांना समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
आयजी संदीप पाटील, एसपी एम. रमेश आणि लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, पुनर्वसन, रोजगार आणि विकासाच्या माध्यमातून गडचिरोलीला नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शेती-सिंचन प्रकल्पांना चालना
2005 ते 2026 या कालावधीत गडचिरोलीतील 800 हून अधिक नागरिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले आहे. त्यांना रोजगाराच्या माध्यमातून समाजाशी जोडण्याच्या प्रयत्नांत लॉयड्स मेटल्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, लॉयड्स मेटल्स आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने गडचिरोलीतील विविध गावांमध्ये शेती व सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेती, बहुपीक पद्धती आणि सौरऊर्जेवर आधारित सिंचनाला प्रोत्साहन देत शाश्वत विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.