मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; यू-ट्यूबर संतोष पंडित यांना अटक

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
पुणे
santosh pandit पुणे महानगरपालिकेच्या कारभारासह शहरातील विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे प्रसिद्ध यू-ट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. कोथरूड परिसरातील विकासकामांबाबत यू-ट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अत्यंत असभ्य तसेच अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याच गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
 

pune youtuber santosh pandit arrested: late-night police action sparks high-voltage drama 
संतोष पंडित यांना ताब्यात घेण्यासाठी कोथरूड पोलिसांचे पथक दोन पांढऱ्या रंगाच्या वाहनांतून त्यांच्या घरी दाखल झाले होते. या पथकात काही पोलिस कर्मचारी साध्या वेशात होते. पोलिसांनी घरात प्रवेश करून संतोष पंडित यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून त्यांना वाहनात बसविले जात असताना संतोष पंडित यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी, “पोलीस रात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आमच्या घरात घुसतात, आमच्यासारख्यांची तीच लायकी आहे,” असे विधान केले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या खाकी वर्दीतील एका पोलिस अधिकाऱ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत त्यांनी, “माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल किंवा सहकार्य करत नाही असे वाटत असेल तर मी माफी मागतो. मला अटक केल्याबद्दल धन्यवाद!” असे म्हटले.
पोलिसांच्या वाहनात बसविण्यापूर्वी संतोष पंडित यांनी स्वतःचा मोबाईल फोन, वाहनाची किल्ली आणि कमरेचा पट्टा काढून तो कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. “पोलिसांना कोणत्या गोष्टींची गरज नाही, हे मला माहीत आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. या संपूर्ण कारवाईदरम्यान त्यांच्या घराबाहेर झालेल्या या हायव्होल्टेज नाट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संतोष पंडित हे पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांतील त्रुटी आणि शहरातील विविध प्रश्नांवर सातत्याने यू-ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.या व्हिडिओप्रकरणी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी तक्रार दाखल केली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा दावा करत या व्हिडिओमधून थेट मंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. मात्र, केवळ टीकेपुरता हा प्रकार मर्यादित न राहता त्यामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरील शिवीगाळ आणि असभ्य भाषेचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.या तक्रारीनंतर डेक्कन पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोथरूड परिसरातील विकासकामांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या प्रकरणात नोंद झालेल्या गुन्ह्याच्या आधारे कोथरूड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री संतोष पंडित यांच्यावर अटकेची कारवाई केली. मध्यरात्री झालेली ही कारवाई, कुटुंबीयांकडून करण्यात आलेले चित्रीकरण आणि संतोष पंडित यांनी पोलिसांशी केलेला संवाद यामुळे या घटनेची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.