मुंबई
movie releases चित्रपटप्रेमींसाठी सप्टेंबर महिना चांगलाच मनोरंजक ठरणार आहे. बॉलीवूडपासून साऊथपर्यंत विविध जॉनरचे बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहेत. अॅक्शन, ड्रामा, थ्रिलर, हॉरर आणि क्राइम अशा विविध धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे, काही चित्रपटांमधून लोकप्रिय कलाकारांच्या नव्या भूमिका पाहायला मिळणार असून, काही बहुचर्चित जोड्या पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत.
सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ‘मिर्झापूर – द मूव्ही’ने होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू आणि श्वेता त्रिपाठी हे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत रवी किशन आणि जितेंद्र कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘मिर्झापूर – द मूव्ही’ हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
यानंतर १० सप्टेंबर रोजी ‘सरदार 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अॅक्शन स्पाय थ्रिलर चित्रपट असून, यात कार्ती पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. तर एस.जे. सूर्या खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून अॅक्शनप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची जोडीही तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘हैवान’ या चित्रपटात सैफ अली खान दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका साकारणार असून, अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेगळ्या भूमिकांमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली असून, ‘हैवान’ ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.१८ सप्टेंबर रोजी ‘C’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. न्याय आणि सत्य यांसह विविध महत्त्वाच्या पैलूंवर चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे थ्रिलर आणि गंभीर आशयाच्या चित्रपटांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट विशेष ठरू शकतो.२५ सप्टेंबर रोजी ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांवर आधारित असलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. भारतीय पौराणिक संदर्भ आणि थ्रिलरची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, ‘द पॅराडाईज’ हा अॅक्शन ड्रामा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटातून नानी आणि श्रीकांत ओडेला ही जोडी ‘दसरा’नंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यामुळे या जोडीचा नवा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.साऊथच्या चित्रपटांची पर्वणी इथेच थांबत नाही. तमिळ भाषेतील हॉरर-थ्रिलर ‘इम्मॉर्टल’ देखील ४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हॉरर आणि थ्रिलरचा थरार अनुभवू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट सप्टेंबरमधील महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
एकूणच, सप्टेंबर महिन्यात बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील विविध धाटणीचे चित्रपट मोठ्या पडद्यावर येत असल्याने चित्रपटप्रेमींसाठी हा महिना मनोरंजनाने भरलेला असणार आहे. ‘मिर्झापूर – द मूव्ही’, ‘सरदार 2’, ‘हैवान’, ‘C’, ‘द पॅराडाईज’, ‘द वन – फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ आणि ‘इम्मॉर्टल’ या चित्रपटांमुळे थिएटरमध्ये अॅक्शन, थ्रिलर, ड्रामा आणि हॉररचा रंग चांगलाच रंगणार आहे.