नागपूर,
shravan श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्याम नगर, नागपूर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या महिला विभागातर्फे ‘श्रावणधारा’ या पावसाळी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन विरंगुळा केंद्रात करण्यात आले होते. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात रसिकांनी तब्बल दोन तास विविध गाण्यांचा आनंद लुटला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश दादा ठाकरे, नगरसेविका विशाखा मोहोड आणि माजी पोलीस निरीक्षक अविनाश बोन्द्रे उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष प्रा. अरुण फाळके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मंडळाच्या ज्येष्ठ महिला सभासद अबोली फाळके यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘ऋतु हिरवा’ या कोरस गीताने ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बालपणीच्या आठवणी जागविणाऱ्या ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ या समूहगीताने वातावरणात उत्साह निर्माण केला. संगीता बापट यांनी ‘काळे ढग नभी भरुनी आले’, शिल्पा भांडारवार यांनी ‘सावन का महिना’, कालिदास कुलकर्णी यांनी ‘रिमझिम के गीत सावन गाये’, विमल चिमुरकर यांनी ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, शुभांगी अणे यांनी ‘वादळ वारं सुटलं गं’, नरेंद्र चिमुरकर यांनी ‘मेरे नैना सावन भादो’, माधवी पंचभाई यांनी ‘ये रे घना ये रे घना’ ही गाणी सादर केली.
अलका गुंडावार यांनी ‘झिलमिल सितारों का आंगन होगा’, अनिल बारापात्रे यांनी ‘रिमझिम गिरे सावन’, प्रज्ञा अंधारे यांनी ‘जब चली ठंडी हवा’, संजय केळापुरे यांनी ‘नीले नीले अंबर पर’, माधुरी कोटपल्लीवर यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, अबोली फाळके यांनी ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, किरण बडवे यांनी ‘बरखा रानी जरा जमके बरसो’, विश्वनाथ बेले यांनी ‘श्रावणात घन निळा’, मिलिंद भूत यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, प्रशांत पांडे यांनी ‘रिमझिम गिरे सावन’, अलका टिकेकर यांनी ‘हाय हाय ये मजबुरी’ आणि अशोक कातुरे यांनी ‘कभी अलविदा ना कहना’ अशी एकाहून एक सरस गाणी सादर केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व गायक ७० ते ८५ वयोगटातील होते.
प्रमुख अतिथी अविनाश ठाकरे, विशाखा मोहोड आणि अंजली बोन्द्रे यांनीही पावसाळी गीत सादर करून कार्यक्रमाचा आनंद घेतला. अविनाश बोन्द्रे यांनी कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत गायकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष अरुण फाळके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी मंडळातर्फे अरुण फाळके आणि अबोली फाळके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्राथमिक संचालन व प्रास्ताविक मंडळाचे सचिव अशोकराव कातुरे यांनी केले. ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अबोली फाळके यांनी केले. स्नेहभोजनाने पावसाळी गीतांच्या या सुरेल कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
सौजन्य: अपर्णा कुळकर्णी, संपर्क मित्र