न्यूयॉर्क
taarak mehta ka ooltah chashmah ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. भारतासोबतच परदेशातही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. आता मालिकेतील कलाकारांनी न्यूयॉर्कमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदार चंदवडकर, मुनमुन दत्ता आणि सोनालिका जोशी यांनी प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगला भेट देत तेथून न्यूयॉर्कची खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांनी अमेरिकेतील भारतीय समुदायासोबत विशेष सेलिब्रेशन केले. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या (FIA) 44व्या इंडिया डे परेडमध्ये मालिकेच्या टीमने सहभाग घेतला. न्यूयॉर्कमधील मॅडिसन अव्हेन्यूवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य परेडमध्ये कलाकारांनी उपस्थित चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. आपल्या आवडत्या कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षक तेथे उपस्थित होते. हातात तिरंगा घेऊन चाहत्यांनी कलाकारांचे उत्साहात स्वागत केले.
या पथकात दिलीप जोशी, मंदार चंदवडकर, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, बलविंदर सिंग सुरी आणि नितीश भलुनी यांच्यासह मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी सहभागी झाले होते. परेडदरम्यान कलाकारांना पाहण्यासाठी भारतीय समुदायातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या या सोहळ्यात मालिकेच्या टीमचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.
यानंतर मालिकेतील कलाकारांनी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगलाही भेट दिली. सोनालिका जोशी यांनी या खास भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालिकेत ‘माधवी भिडे’ची भूमिका साकारणाऱ्या सोनालिका या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहेत. पारंपरिक दागिने, कपाळावरील बिंदी आणि आकर्षक हेअरस्टाइलमुळे त्यांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
मंदार चंदवडकर यांनीही न्यूयॉर्कमधील या उंचीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. मालिकेत ते आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारतात, तर मुनमुन दत्ता ‘बबिता अय्यर’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरात लोकप्रिय आहेत. या तिघांचे न्यूयॉर्कमधील फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाकारांनी शेअर केलेल्या छायाचित्रांच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.
एम्पायर स्टेट बिल्डिंगविषयी बोलताना, हीच ती इमारत असल्याचे कलाकारांनी नमूद केले, जिथे ‘किंग काँग’ या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. या ठिकाणी प्रवेश करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुनमुन दत्ता यांनी एम्पायर स्टेट बिल्डिंगवरील एक व्हिडीओ शेअर करत, ‘जेव्हा तुम्हाला उंचीची भीती वाटते,’ अशी भावना व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने यंदा आपल्या प्रवासाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 जुलै 2008 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही मालिकेतील अनेक कलाकार त्यांच्या लोकप्रिय पात्रांमुळे घराघरात ओळखले जातात.