प्रेयसीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

- प्रियकराने मागितली पाच लाखांची खंडणी

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
crime news प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने महिलेच्या इन्स्टाग्राम खात्यात बेकायदेशीर प्रवेश करून तिचे खासगी फोटो अपलोड केल्याचाही आरोप आहे. अनिलसिंग पोर्ते (२८) असे आरोपीचे नाव आहे.
 

crime news 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपीची मैत्री होती. त्यानंतर दोघे काही काळ प्रेमसंबंधात होते. मात्र, आरोपीच्या कथित वर्तणुकीमुळे महिलेने संबंध तोडले. पुढे महिलेने विवाह केला. त्यानंतरही आरोपीकडून तिचा छळ सुरूच राहिल्याचा आरोप आहे. ५ एप्रिल २०२३ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपीने महिलेला वारंवार धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेचे खासगीत काढलेले फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी देत ते फोटो व्हायरल न करण्याच्या बदल्यात आरोपीने पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने महिलेच्या इन्स्टाग्राम खात्यात बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवून तिचे खासगी फोटो अपलोड केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.crime news सततच्या धमक्या आणि ऑनलाइन छळाला कंटाळून अखेर महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार १ सप्टेंबरच्या रात्री सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आरोपीविरुद्ध खंडणी, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया खात्याचा वापर याबाबत सायबर पोलिस पुढील तपास करीत आहेत.