वर्धा,
upendra kothekar अलीकडे प्रत्येक बाबीत राजकारण शिरले आहे. राजकारणा पलीकडेही काही असते, ती दृष्टी हरवत चालली आहे. ही फारच दुर्दैव्याची बाब आहे हे मी राजकारणात असलो तरी स्पष्ट बोलतो. एकवेळ विचार भिन्नता असू शकते, ती मान्यही. परंतु, समाजात रूढ होत असलेली विचार शून्यता सर्वांसाठी घातक ठरणारी आहे. ती घालवण्याचे कार्य साहित्य निर्मिती आणि साहित्यविषयक चळवळीच करू शकतात असे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, गीतकार आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाचे बुधवारी आयोजित जिल्ह्यातील आजीव सदस्य तसेच साहित्य रसिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप दाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी श्याम माधव धोंड, डॉ. गजानन कोटेवार, मेळावा निमंत्रक डॉ. राजेंद्र मुंढे, समन्वयक उपअभियंता महेश मोकलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोठेकर पुढे म्हणाले, समाजात आज चित्र विपर्यस्त दिसत आहे. याला काही प्रमाणात मागील पिढीही जबाबदार आहे. कारण, आजच्या पिढीच्या समोर आम्ही खरा इतिहास, परंपरा आणि पर्यायवाचक चित्र ठेऊ शकलो नाही. असे असले तरीही आज सजग युवापिढी आपला विवेक जपत व्यत होते आहे हे आशावादी चित्र आहे. नवीन पिढीला पूरक ठरेल अशी साहित्य निर्मिती व चळवळी होणे गरजेचे आहे. असे उपक्रम समाजासाठी उपकृत असतात त्याला माझा सदैव हातभार असेल असेही ते म्हणाले.
कवी श्याम माधव धोंड यांनी आता थोर मोठ्यांनी लहानपण घ्यावे आणि टीनएजरला संधी द्यायला पाहिजे, असे मोठ्यांनी केले तर त्यांचे मोठेपण अधिक मोठे होत असल्याचे ते म्हणाले.
दाते यांनी वर्ध्याच्या साहित्य परंपरेचा धावता आढावा घेत, सक्षम समाज निर्मितीसाठी सातत्यपूर्ण कार्य करणार्या साहित्य संस्थेच्या पाठीशी सरकार व समाजाने उभे राहिले पाहिजे असे सांगितले. सुरगावाचे प्रवीण देशमुख महाराज यांनी त्यांचे गाव ‘कवितेचे गाव’ निवडल्या बद्दल आभार मानले.