वॉशिंग्टन,
US warning regarding Modi-Pezeshkian meeting भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांची किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे एससीओ बैठकीदरम्यान झालेली भेट चर्चेत आली आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे. इराणसोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या कोणत्याही देशावर ट्रम्प प्रशासन निर्बंध लादण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे रुबियो यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेत रुबियो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. भारत आणि इराण यांच्यात एखाद्या व्यापार कराराची तयारी सुरू आहे का, असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर रुबियो यांनी भारत आणि इराणमध्ये कोणताही व्यापार करार झाल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे सांगितले. प्रत्येक देशाला स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. जगातील अनेक देश इराणी राजवटीसोबत चर्चा करत असल्याचे रुबियो यांनी म्हटले.

मात्र, इराणवरील निर्बंधांच्या मुद्द्यावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट असल्याचे रुबियो यांनी सांगितले. कोणत्याही देशाने इराणला निर्बंधांपासून वाचण्यासाठी मदत करू नये, असे त्यांनी म्हटले. इराणला उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा अण्वस्त्रांच्या विकासासाठी होईल, अशा प्रकारची मदत कोणत्याही देशाने करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणविरोधातील कारवाईबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. अमेरिका इराणविरुद्धचे युद्ध सातत्याने जिंकत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणचे ध्येय आता केवळ वेळेचा प्रश्न असून ते लवकरच संपेल, असेही त्यांनी म्हटले. इराणचे नौदल, हवाई दल आणि सैन्य नष्ट झाले असून आता त्यांच्याकडे काहीही उरलेले नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही ट्रम्प यांनी मोठे विधान केले. अमेरिकेचे या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवर आता नियंत्रण असल्याचे त्यांनी सांगितले आणि अनेक जहाजे तेथून प्रवास करत असल्याचा दावा केला. याचवेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नाव बदलण्याची कल्पनाही ट्रम्प यांनी मांडली. या सामुद्रधुनीचे नाव बदलून ‘ट्रम्प सामुद्रधुनी’ करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.