नवी दिल्ली,
vande-bharat-executive-seatsवंदे भारत ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधील फिरत्या आसनांची व्यवस्था बदलण्याचा आणि परिचालन कार्यक्षमता सुधारण्यासाठी आसने अधिक मजबूत करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ रेल्वे अभियंत्यांनी दिला आहे. ही व्यवस्था ट्रेनचे चर्चेत असलेले प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मते, या सुविधेसाठी अधिक जागेची आवश्यकता असते़ त्यामुळे भागांची झीज होण्याची शक्यता वाढते, परिणामी वारंवार देखभालीची गरज भासते.
हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या ‘प्रिन्सिपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर्स’ परिषदेत चर्चेला आला़ परिषदेत डबे उत्पादन युनिट्सनी या डब्यांमधील फिरत्या आसनांची सोय काढून टाकून पारंपरिक शताब्दी आणि इतर गाड्यांप्रमाणे आसने स्थिर करण्याची कल्पना मांडली. वरिष्ठ अभियंत्यांनी असेही सुचवले की, आसने स्थिर केल्याने ती फिरवण्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी होईल़ त्यामुळे डब्यात आसनांची एक अतिरिक्त रांग जोडणे शक्य होईल.
रेल्वे बोर्डानुसार, वंदे भारतच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या डब्यांमधील फिरत्या आसनांची सोय काढून टाकून आसने अधिक मजबूत केली जाऊ शकतात. त्यामुळे आसनांच्या रांगांमधील अंतर कमी करता येत असल्याने एक्झिक्युटिव्ह क्लासच्या डब्यांमध्ये आसनांची आणखी एक रांग वाढवता येईल या सूचनेवर कार्यवाही सुरू करण्यासाठी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या प्रधान मुख्य यांत्रिक अभियंत्यांना नियुक्त केले आहे. सध्या, वंदे भारत चेअर कार ट्रेनच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या डब्यांमध्ये १८०-अंश फिरणारी आसने आहेत़ ते वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासला इतर वर्गांपेक्षा तसेच आसनव्यवस्था असलेल्या इतर गाड्यांपेक्षा वेगळे ठरवणारे एक वैशिष्ट्य आहे.
एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानुसार, सध्याच्या वंदे भारत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये, प्रवासी आसनांमध्ये फिरण्याची आणि मागे झुकण्याची दोन्ही यंत्रणा आहे. यामुळे प्रवाशांना ट्रेनच्या गतीनुसार आसनाची दिशा खिडकीकडे, प्रवासाच्या दिशेकडे किंवा विरुद्ध दिशेकडे समायोजित करता येते़ सध्याच्या फिरणाऱ्या वैशिष्ट्यासाठी आसनाच्या आजूबाजूला अतिरिक्त यांत्रिक घटक, मोकळी जागा आणि जागेची आवश्यकता असते़ त्यामुळे हे घटक झिजण्याची, सैल होण्याची आणि निकामी होण्याची शक्यता वाढते़ परिणामी वारंवार देखभालीची आवश्यकता भासते. ही एक गुंतागुंतीची यंत्रणा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.