मुंबई,
Will Rohit Sharma retire today? भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्यातील नियोजनासह वरिष्ठ खेळाडूंच्या कारकिर्दीवर चर्चा करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत माजी कर्णधार रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्यावर विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित केवळ वनडे खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्सवरील तिसरा वनडे त्याचा अखेरचा सामना ठरेल, अशी चर्चा असतानाच त्याने शानदार शतक झळकावून या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये रोहितची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. त्यानंतर पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या अध्यक्षांशिवाय अन्य एका सदस्याने रोहितला समितीने पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. तसेच लॉर्ड्सवरील सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे का, अशी विचारणाही करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे रोहित नाराज झाल्याचे वृत्त आहे. मात्र, लॉर्ड्सवर पराभव पत्करावा लागला असला तरी रोहितच्या शतकामुळे त्याच्या तातडीच्या निवृत्तीची शक्यता कमी झाली.
दरम्यान, ३ सप्टेंबरच्या बैठकीत रोहितसोबतच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या भविष्यासंदर्भातही चर्चा होणार आहे. सध्या कोहली आणि जडेजा यांच्यावर रोहितइतके दडपण नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा मुद्दा या बैठकीतील प्रमुख चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.